सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील 111 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून उमेदवारांना अर्ज करण्यास 30 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या समांतर आरक्षणाच्या अध्यादेशामुळे दिव्यांगासाठी 4 टक्के जागा आरक्षित करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकार्यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 25 जानेवारी रोजी समांतर आरक्षणासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार सरळ सेवा पदभरती करताना समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
समांतर आरक्षणामध्ये 30 टक्के महिला आरक्षण, 4 टक्के दिव्यांग, 5 खेळाडू आदी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे 111 जागांमध्ये समांतर आरक्षणातील 4 टक्के दिव्यांग आरक्षणाचा अंतर्भाव करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. परिणामी, विद्यापीठ पदभरतीचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ द्यावी लागणार आहे, असे विद्यापीठाच्या अधिकार्यांकडून सांगितले जात आहे. विद्यापीठातील 111 जागांसाठी सुमारे 5 हजार अर्ज येण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्यामुळे त्यात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विद्यापीठाकडून या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.