Logo
ताज्या बातम्या

कोल्हापूर : शिवसेनेचे महाअधिवेशन आजपासून; मुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्री उपस्थित राहणार

शिवसेनेच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. शुक्रवार व शनिवार (दि. 16 व 17) कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे भव्य मंडपात अधिवेशन होणार आहे. अधिवेशनासाठी नऊ मंत्री, 13 खासदार आणि 43 आमदार यांच्यासह देशभरातील चार हजारावर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुक्रवारी कोल्हापुरात आगमन होणार आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती संयोजक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. शुक्रवारी सकाळी 9 वा. महाअधिवेशनासाठी नोंदणी होणार आहे. सकाळी 10 वा. मुख्य नेत्यांचे महासैनिक दरबार हॉलमधील मंडपात आगमन होणार असून त्यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला शुभारंभ होईल. सकाळी 10.30 ते 1.30 यावेळेत पहिले सत्र होणार असून संघटनात्मक विषय चर्चा होईल. दुपारी 3 ते 5.30 या कालावधीत होणार्‍या दुसर्‍या सत्रात राजकीय विषय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 ते 7.30 या तिसर्‍या सत्रात सरकारी योजना कार्यशाळा होणार आहे. शनिवारी (दि. 17) सकाळी 8 वा. श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत चौथे सत्र होणार असून निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण असेल. दुपारी 12.30 वा. अधिवेशनाचा समारोप होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पदाधिकार्‍यांसह आमदार, खासदारांना मागदर्शन करणार आहेत. सर्किट हाऊसकडून लाईन बझारकडे जाणार्‍या रस्त्यावर महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर अधिवेशनासाठी आलिशान भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे चार ते पाच हजार खुर्च्यांची व्यवस्था केली जात आहे. सर्किट हाऊससमोरील मोकळ्या जागेत पार्किंगसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार येणार असल्याने गुरुवार दुपारपासूनच पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातही चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. 700 बोर्ड, दहा हजारावर भगवे झेंडे शिवसेनेचे महाअधिवेशन पहिल्यांदाच कोल्हापुरात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी अवघे कोल्हापूर शिवसेनामय केले आहे. शहरात 74 होर्डिंग लावण्यात आले आहेत. यात ताराराणी चौकातील तब्बल 110 फूट लांबी आणि 32 फूट उंचीचे होर्डिंग आकर्षण ठरत आहे. त्याबरोबरच तब्बल 700 बोर्ड लावले असून दहा हजारावर भगवे झेंडे आहेत. शहरातील बहुतांश चौक, वळणाचे रस्ते, रस्ता दुभाजके आदी ठिकाणी होर्डिंग, बोर्ड आणि धनुष्यबाण असलेले भगवे झेंडे लावल्याने शहरात सर्वत्र भगवे वातावरण तयार झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची शनिवारी गांधी मैदानात सभा शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर शनिवारी सायंकाळी 6 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरातील गांधी मैदानात जाहीर सभा आयोजित केली आहे. सभेला राज्यातील मंत्र्यासह आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. सभेच्या तयारीसाठी ठिकठिकाणी बैठका झाल्या आहेत. सभेला 75 हजार नागरिक उपस्थित राहतील. शहरातील नागरिकांनाही सभेची उत्सुकता लागली असून ही सभा राज्यात रेकॉर्ड ब—ेक ठरेल, अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली. शहरातील सर्व हॉटेल्स फुल्ल… महाराष्ट्रासह देशभरातील शिवसेना पदाधिकारी आणि आमदार, खासदार कोल्हापुरात येत आहेत. तसेच सर्व नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच मोठी हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. गुरुवारपासून शनिवारपर्यंत तब्बल 100 हॉटेलमधील दोन हजारावर खोल्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. कोल्हापुरात येणार्‍या शिवसेना पदाधिकार्‍यांची कोणतीही कमतरता राहू नये यासाठी क्षीरसागर स्वतः चोख नियोजन करत आहेत. …म्हणून कोल्हापुरातून सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते. त्यामुळे प्रत्येक दौर्‍याची सुरुवात ते कोल्हापुरातूनच करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कोल्हापूरवर प्रेम आहे. त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात ते कोल्हापुरातून करतात. अगदी मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी पहिल्यांदा कोल्हापुरात येऊन श्री अंबाबाई देवीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमाची सुरुवातही त्यांनी अंबाबाई दर्शनाने कोल्हापुरातून केली. अशाप्रकारे सर्वच मुख्यमंत्री सर्वच कार्यक्रमाची सुरुवात कोल्हापुरातूनच करतात, असेही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले.