सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तेल कंपन्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दरानुसार स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले आहे. त्यामुळं देशात तेलाच्या किंमती होण्याची शक्यता आहे. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानंयाबाबतची माहिती दिली आहे.
खाद्यतेलाच्या किमती अचानक कमी करणं सध्या शक्य होईल का?
सरकारनं जरी तेल कंपन्यांना खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले असले तरी, प्रत्यक्षात दर कमी होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत खाद्यतेल क्षेत्रातील तज्ज्ञांनी काही माहिती दिली आहे. खाद्यतेलाच्या किमती अचानक कमी करणे सध्यातरी शक्य होणार नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. मार्चपर्यंत देशात मोहरी काढणीला सुरुवात होईल, तेव्हा खाद्यतेलाच्या किमती कमी होतील. मोहरी काढणीनंतर खाद्यतेलाचा नवीन पुरवठा होईल, त्यानंतर खाद्यतेल किंवा स्वयंपाकाच्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं तेल कंपन्यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय दरानुसार किंमती कमी करण्यास सांगितले आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाचे दर जागतिक किमतीच्या सापेक्ष कमी केले पाहिजेत, जे काही काळापासून होत नव्हते, त्यामुळं आता त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत, असे मत सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं व्यक्त केलं आहे.
महागाई नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न
केंद्र सरकार महागाई नियंत्रणासाठी विविध मार्ग अवलंबत आहे. खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावले उचलत आहे. डिसेंबरमध्येच सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाची मुदत आणखी वाढवली आहे. आता खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क मार्च 2025 पर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे.