भारतीयांची आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित माहिती चोरीला गेल्याची मोठी माहिती समोर आली आहे. एका अमेरिकन फर्मने डेटा लीक झाल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. डार्क वेबवर आधार डेटा लीक झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. डार्क वेबवर 81.5 कोटी भारतीयांचा आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित डेटा लीक झाल्याचा दावा अमेरिकन कंपनीने केला आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीचा दावा आहे की, 81.5 कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे.
आधार आणि पासपोर्ट संबंधित माहिती चोरीला
लीक झालेल्या माहितीमध्ये नाव, फोन नंबर, पत्ता, आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती आहे. इतकंच नाही तर हा डेटा ऑनलाइन विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. अमेरिकन फर्मने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 9 ऑक्टोबर रोजी 'pwn0001' या व्यक्तीने ब्रीच फोरमवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये 81.5 कोटी भारतीयांच्या आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती देण्यात आली आणि हा डेटा विकण्याचा प्रयत्न केला गेला. सुरक्षा अहवालानुसार, संबंधित व्यक्तीने आधार आणि पासपोर्टशी संबंधित माहिती 80 हजार डॉलरमध्ये विकण्याची ऑफर दिली होती.
कोविड पोर्टलवरील डेटा चोरीला?
मीडिया रिपोर्टनुसार, लीक झालेला डेटा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडील असू शकतो. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, ICMR ने अद्याप यासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. pwn0001 द्वारे शोधलेल्या या डेटा लीकची सीबीआय चौकशी करत असल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे.
80 कोटींहून अधिक भारतीयांचा खाजगी डेटा लीक
भारतातील सर्वात मोठा डेटा लीकची माहिती हॅकरने X मीडियावर देखील दिली आहे. हॅकर्सनी 80 कोटींहून अधिक भारतीयांचा खाजगी डेटा लीक केला आहे. लीक झालेल्या डेटामध्ये नाव, वडिलांचे नाव, फोन नंबर, पासपोर्ट नंबर, आधार क्रमांक आणि वय या माहितीचा समावेश आहे. आतापर्यंत या डेटा लीक प्रकरणावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
याआधीही माहिती चोरीला
याआधी, ऑगस्ट महिन्यामध्ये लुसियस नावाच्या आणखी एका व्यक्तीने ब्रीच फोरमवर 1.8 टेराबाइट डेटा विकण्याची ऑफर दिली होती. एप्रिल 2022 मध्ये ब्रुकिंग्सच्या अहवालानुसार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी UIDAI ची तपासणी केली होती आणि असे आढळून आले की प्राधिकरणाने त्यांच्या ग्राहक विक्रेत्यांचे प्रभावीपणे नियमन केले नाही आणि त्यांच्या डेटा व्हॉल्टच्या सुरक्षिततेचे संरक्षण केलं नाही, त्यामुळे हॅकर्सने डेटा लीक केला. त्यायाआधीही डेटा लीकचे प्रकरण समोर आले होते. जूनमध्ये, CoWin वेबसाइटवरून VVIP सह लसीकरण झालेल्या नागरिकांचा वैयक्तिक डेटा टेलिग्राम मेसेंजर चॅनेलद्वारे कथितपणे लीक झाल्यानंतर सरकारने तपास सुरू केला होता.