लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यात प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने कामकाजात सक्रीय झाले आहेत. बुधवारी कॅबिनेट बैठकीत मोदींनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना विशेष कानमंत्र दिला आहे
सूत्रांनुसार, कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मंत्र्यांना पुढील १०० दिवसांचा एक्शन प्लॅन मागवला आहे. त्यासोबतच पुढील ५ वर्षाचा रोडमॅप देण्याची सूचनाही केली आहे. कुणाला मंत्रिपदाची संधी मिळेल किंवा नाही याचा विचार न करता तुमच्या आयडिया, एक्शन प्लॅन आणि रोडमॅप द्या असं मोदींनी सांगितले आहे.
तसेच बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यात ऊस खरेदीच्या किंमतीत आठ टक्क्यांनी वाढ करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. यापुढे ऊस खरेदी ३१५ रुपये प्रति क्विंटलहून वाढून ३४० रुपये प्रतिक्विंटल केली आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोदी सरकारच्या मागील १० वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. २०१४ पूर्वी शेतकऱ्यांना धान्यखरेदीसाठी रस्त्यावर उतरायला लागायचे. ऊसाला योग्य दर मिळत नव्हता. परंतु मोदी सरकारने या क्षेत्रात चांगले काम केले. २०१९-२० या काळात ७५,८५४ कोटी रुपये ऊस उत्पादकांना मिळाले. २०२०-२१ मध्ये ९३,०११ कोटी रुपये मिळाले. २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांना १.२८ लाख कोटी रुपये मिळाले. २०२२-२३ मध्ये १.९५ लाख कोटी मिळाले. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात गेले असा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला.