सणांचा राजा अर्थात दीपोत्सवाला आता अवघे दोन आठवडे राहिले आहेत. वातावरणात दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नोव्हेंबरमध्ये अवकाशातही खगोलीय घटनांनी जणू दिवाळीच साजरी होणार आहे.
या महिन्यात घडणाऱ्या खगोलीय घटनांत गुरू पृथ्वीजवळ येत असून, तेजस्वी दिसणार आहे. त्याचप्रमाणे पहाटे शुक्र अधिक तेजस्वी दिसेल. चंद्राची शुक्र, शनी आणि बुध ग्रहांशी युती होणार आहे. दोन उल्कावर्षाव आणि धूमकेतू दिसणार आहेत. या सुवर्ण संधीचा फायदा खगोल अभ्यासक, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
३ नोव्हेंबर : गुरू पृथ्वीजवळ येत आहे. संपूर्ण महिन्यात पूर्वेला संध्याकाळी साध्या डोळ्याने सर्वाधिक तेजस्वी दिसणार आहे.
९ नोव्हेंबर : पहाटे पूर्वेला शुक्र - चंद्राची युती दिसेल.
१० नोव्हेंबर : सी/२०२३ - एच २ (लेमॉन) हा धूमकेतू पृथ्वीजवळ येणार असून, तो दुर्बिणीने दिसणार आहे.
१३ नोव्हेंबर : युरेनस ग्रह पृथ्वीजवळ येणार असून, तो साध्या डोळ्याने दिसेल.
१४ नोव्हेंबर : संध्याकाळी सूर्य मावळताच चंद्र आणि बुध सोबतच मंगळ ग्रहाची युती दिसेल. बुध ग्रहाच्या जवळ मंगळ ग्रहसुद्धा पाहण्याची संधी आहे.
१७, १८ नोव्हेंबर : रात्री पूर्व दिशेला लिओनीड उल्कावर्षाव पाहावयास मिळेल. ताशी २० उल्का दिसण्याचा अंदाज आहे.
२० नोव्हेंबर : संध्याकाळी चंद्र आणि शनीची युती दिसेल.
२५ नोव्हेंबर : संध्याकाळी चंद्र आणि गुरू ग्रहाची युती पाहायला मिळेल.
२७ नोव्हेंबर : कार्तिक पौर्णिमा असून, चंद्र तेजस्वी दिसेल.
२८ नोव्हेंबर : पहाटे शुक्र ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याने तेजस्वी दिसणार आहे.