अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य मंदिरातील राम लल्लाच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी शरयू नदीमध्ये स्नान करतील. यानंतर शरयूचे पवित्र जल घेऊन राम मंदिराकडे पायी जातील.
अभिषेक सोहळ्याच्या एक दिवस आधी म्हणजे २१ जानेवारीला पंतप्रधान अयोध्येत येण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. अभिषेक सोहळ्याच्या एक दिवस आधी म्हणजे २१ जानेवारीला पंतप्रधान अयोध्येत येण्याची शक्यता आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृत जन्मोत्सव आणि रामचरित मानस प्रवचनातही पंतप्रधान सहभागी होतील.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अयोध्या दौऱ्याशी संबंधित काही नवीन कार्यक्रमांचाही विचार केला जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टसह प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी ‘एसपीजी’सोबत चर्चा करत आहेत. ‘एसपीजी’ने ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच याला अंतिम स्वरूप दिले जाईल.
22 जानेवारीला पंतप्रधानांच्या अयोध्येत मुक्कामादरम्यान त्यांची सकाळ शरयू स्नानाने होईल. येथे आंघोळ केल्यानंतर पंतप्रधान कलशात जल घेऊन रामपथातून भक्तिमार्गाने राम मंदिराकडे प्रयाण करतील. हनुमानगढी हे भक्तीमार्गावर वसलेले आहे. राम मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हनुमंताचे दर्शन घेतील. भक्तिमार्गावरच छोटी देवकाली मंदिर आहे. माता सीतेचे कौटुंबिक दैवत म्हणून महत्त्व लक्षात घेऊन मोदी येथेही भेट देऊ शकतात आणि पूजा करू शकतात, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.