Logo
ताज्या बातम्या

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ८ दिवस अखंड रामनाम जप, ११ यजमान करणार ४५ नियमांचे कठोर पालन

अयोध्याराम मंदिरातील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे आठ दिवस राहिले आहेत. अनेक ठिकाणी विविध धार्मिक गोष्टींचे पालन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा दिवसांचे अनुष्ठान करत आहेत. मकरसंक्रांतीपासून अनुष्ठान, यम-नियम आणि संयम यांसह अनेक गोष्टी आचरणास सुरुवात होत आहे. राम मंदिराच्या भव्य सोहळ्यातील ११ यजमान आठ दिवस ४५ नियमांचे कठोर पालन करणार असून, अखंड रामनामाचा जप सुरू करण्यात येत आहे. या नियमांचे पालन केल्याने यजमान दाम्पत्य धार्मिक विधीस सिद्ध होऊ शकतील. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोबतच यजमानांचे संकल्प व विधीही पूर्ण होतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ११ दाम्पत्य यजमान म्हणून उपस्थित राहणार आहेत. मकरसंक्रांतीपासून सर्व यजमान प्रथम स्नान करून आठ दिवसांच्या विधीसाठीचा संकल्प करतील. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे सर्व यजमानांसाठी ४५ नियम व विधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अखंड रामनाम जप, जीवनशैली सात्विक ट्रस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले की, यजमानांना आठ दिवस ४५ नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची शपथ घेण्यात येईल. नियमित पूजा आणि संध्या प्रार्थनेसोबतच आहार आणि जीवनशैली सात्विक ठेवत रामनामाचा सतत जप करावा लागेल. ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी काशीचे अभ्यासक पं.गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्याकडे यज्ञमान्यांच्या नियमांबाबत सल्ला मागितला होता. २२ जानेवारीला ८४ सेकंदांच्या अभिजित मुहुर्तावर होणारा हा सोहळा पूर्णपणे सनातनी आणि वैदिक परंपरांचे पालन करणार आहे. दरम्यान, अयोध्येतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह ५५ देशांतील सुमारे १०० प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. सर्व व्हीव्हीआयपी विदेशी प्रतिनिधी २० जानेवारीला लखनौला येतील. त्यानंतर २१ जानेवारीला सायंकाळपर्यंत ते अयोध्येला पोहोचतील. धुके आणि हवामानामुळे या कार्यक्रमापूर्वी प्रतिनिधींना भारतात येण्याची विनंती करण्यात आली आहे, असे जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले. आम्ही कोरियाच्या महाराणींनाही आमंत्रित केले आहे, ज्या प्रभू श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा करतात, असे स्वामी विज्ञानानंद यांनी सांगितले.