राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत वस्त्रोद्योगातील पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 45 टक्के भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार असून, 51.30 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचा चारशे उद्योगांना फायदा होणार आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीने 28 जून 2023 रोजी यासंदर्भात शिफारस केली होती. हे भांडवली अनुदान देण्यासाठी अनुत्पादक थकबाकीची (एनपीए) अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच जुन्या यंत्रसामुग्रीस पात्र समजून हे भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. या पॉवरलूम मेगा क्लस्टर प्रकल्पास तीन हप्त्यांऐवजी एकाचवेळी संपूर्ण 45 टक्के अनुदान देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
51.30 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर या प्रकल्पाला उभारी मिळणार आहे, तसेच 400 उद्योगांना याचा फायदा होणार आहे. भांडवली अनुदानाबाबत निर्णय झाला असला, तरी याबाबत रात्री उशिरापर्यंत यंत्रमाग उद्योजकांसह वस्त्रोद्योगातील घटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. आदेशाबाबत स्पष्टता झाल्यानंतरच आणखी विस्तृतपणे याची माहिती मिळणार आहे.