Logo
ताज्या बातम्या

एमपीएससीची पूर्व परीक्षा २८ एप्रिलला; २०२४ चे आंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे अंदाजे २८ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केली जाईल. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत नियोजित आहे.एमपीएससीकडून २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाकडून दरवर्षी नियोजित वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे, यादृष्टीने आयोगाकडून काही महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात येते.त्यानुसार पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये १६ परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षांचा समावेश आहे.शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे.शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो. तसा बदल झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने नमूद केले आहे.