अयोध्येत 22 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी प्रभू रामाच्या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 'ट्विटर'वर यासंदर्भात माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट केलं आहे की, "अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकासाठी मूर्तीची निवड निश्चित झाली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत स्थापना केली जाणार आहे." पुढे त्यांनी लिहिलं आहे की, प्रभू श्रीराम-हनुमानाच्या अतूट नात्याचं हे आणखी एक उदाहरण आहे. कर्नाटकातील हनुमानाच्या भूमीतून रामललाची ही सेवा आहे यात शंका नाही."
अयोध्येत निर्माणाधीन प्रभू श्रीराम मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येतील प्रशासन आणि सरकार पूर्णपणे गुंतलं आहे. दुसरीकडे, राम मंदिरात अभिषेक करण्यासाठी तीन मूर्तींपैकी एकाची निवड केली जाणार होती. आता या मूर्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अरुण योगीराजांच्या मूर्तीची केवळ निवड करण्यात आली आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला
श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती देत सांगितलं की, मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. 14 ते 15 जानेवारी या कालावधीत संत आणि ऋषीमुनींच्या हस्ते अभिषेकासह प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख झालेली नाही.
मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे
मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या दोन मूर्ती असतील. एक प्रभू श्रीरामाच्या बालपणातील आणि दुसरा रामलल्लाची असेल. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी रुरकी आणि पुणे येथील संस्थांमधील शास्त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे.
दररोज सुमारे 75 हजार भाविक दर्शन घेणार
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सुमारे 10 हजार विशेष अतिथी सहभागी होतील. यामध्ये राम मंदिर निर्माण चळवळीशी संबंधित ऋषी-संत समाजातील लोक आणि देश-विदेशातील आणि विशेषतः उत्तर प्रदेशातील नामांकित लोकांचा समावेश असेल. 26 जानेवारीपासून राम मंदिर भक्तांसाठी खुले केले जाईल, त्यानंतर रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, अयोध्येतील राम मंदिरात दररोज सुमारे 75 हजार भाविक दर्शन घेऊ शकतील.