अलीकडच्या काळात प्रकाशित होणार्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवालात साधर्म्य असून डिजिटल कौशल्य आणि वेगवान आर्थिक विकासामुळे तरुणांसाठी देश आणि परदेशात रोजगार वाढीच्या संधी वाढणे आणि जागतिक मंदीच्या आव्हानादरम्यान भारत वेगाने विकासाकडे वाटचाल करत असल्याचे अधोरेखित होत आहे. आगामी काळात देशात स्किल इंडिया, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून कौशल्य, शिक्षण आणि उद्योजकता वाढविण्यासाठी डिजिटल सार्वजनिक आराखड्याचा संपूर्णपणे लाभ घेत नव्या पिढीसाठी अधिकाधिक रोजगारनिर्मिती करावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 डिसेंबर रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि जागतिक सहकार्य (जीपीएआय)च्या शिखर संमेलनात बोलताना, ‘एआय हे 21 व्या शतकातील विकासाचे सर्वात मोठे माध्यम ठरू शकते,’ असे सांगितले. याप्रमाणे भारतातील तरुणांची एआय कॉम्प्युटिंग क्षमता वाढविण्यासाठी लवकरच मोहीम सुरू केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या नेटवर्कचा वापर टीयर-2 आणि टीयर-3 शहरातील तरुणांमध्ये एआय कौशल्य वाढविण्यासाठी केला जाईल. या आधारावर नवीन पिढी स्टार्टअप आणि नवोन्मेष वाढवताना मानवी मूल्यांसह देशाला वेगवान विकासाच्या वाटेवर नेतील.
11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी ‘विकसित भारत-2047 : तरुणांचा आवाज’ या कार्यक्रमात व्हर्च्युअली मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारताचा हा अमृतकाळ असून, हा या काळात नवीन पिढी राष्ट्राच्या जडणघडणीचा संकल्प करत 2047 पर्यंत देशाला विकसित करण्याचे स्वप्न साकारू शकते. यादरम्यान नीती आयोगाने दहा डिसेंबरला देशाच्या विकासाबाबत एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले, केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी धोरणे म्हणजे ‘पंतप्रधान कौशल्य विकास’, ‘सर्वंकष शिक्षण अभियान’, ‘जनधन योजना’, ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘उच्च तंत्रज्ञान शिक्षणविस्तार कार्यक्रम’ हे यशस्वीरीत्या पुढे नेण्यात येत असून, त्यानुसार भारत डिजिटल कौशल्यप्राप्त नव्या पिढीच्या आधारावर आणि वेगवान आर्थिक विकासाच्या बळावर 2027 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ शकतो. तसेच 2047 पर्यंत 30 खर्व डॉलरची अर्थव्यवस्था होताना विकसित देश म्हणून नावारूपास येताना दिसेल. अर्थात, अलीकडच्या काळात प्रकाशित होणार्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अहवालात साधर्म्य असून, डिजिटल कौशल्य आणि वेगवान आर्थिक विकासामुळे तरुणांसाठी देश आणि परदेशात रोजगार वाढीच्या संधी वाढणे आणि जागतिक मंदीच्या आव्हानादरम्यान भारत वेगाने विकासाकडे वाटचाल करत असल्याचे अधोरेखित होत आहे.
एकीकडे, देश जगातील सर्वाधिक 6.5 टक्के विकासदर राखताना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याचे दिसत असताना, वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेचे महत्त्व लक्षात घेता, जगभरातील उद्योजक आणि अनिवासी भारतीयांची पावलेही भारताकडे वाटचाल करत आहेत. विशेष म्हणजे ब्रिटनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय कुशल कामगारांची, डॉक्टरांची, विद्यार्थ्यांची संख्या ब्रिटनच्या व्हिसा यादीत आघाडीवर आहे. जुलै 2022 पासून जून 2023 या एक वर्षांत व्हिसा मिळवण्यात सर्वात पुढे भारतीय राहिले आहेत. एका अहवालानुसार, 2021 पासून 2022 या काळात भारतीयांच्या स्किल्ड वर्कर्स व्हिसामध्ये सुमारे 63 टक्के वाढ असल्याचे नमूद केले आहे.
याप्रमाणे ब्लूमबर्गच्या नव्या रोजगार अहवालानुसार, इस्रायल सरकारने 1 लाख भारतीय तरुणांना इस्रायलमध्ये नोकरीसाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. याप्रमाणे भारत आणि तैवान यांच्यात रोजगारावरून लवकरच करार होण्याची शक्यता आहे. या करारानुसार, तैवानमध्ये 1 लाख भारतीयांना रोजगार मिळेल. प्रत्यक्षात तैवानमध्ये बेरोजगारीचा दर किमान पातळीवर पोचला आहे. त्यात उत्पादन, आरोग्य, कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज आहे आणि त्यांच्या देशातून ही गरज भागत नसल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी तैवानने भारताकडे करार करण्यासाठी हात पुढे केला आहे. कामगार आदानप्रदान करण्याबाबत भारताने अगोदरच जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आदी 13 देशांशी करार केला आहे. यापैकी बहुतांश देशांना ज्येष्ठ नागरिकांची समस्या जाणवत आहे आणि त्यामुळे कौशल्यप्राप्त नवीन पिढीच्या टंचाईला सामना करावा लागत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) ने जारी केलेल्या एका अहवालानुसार, 1 अब्ज 42 कोटी 86 लाख लोकसंख्येसह भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला आहे, तर दुसर्या स्थानावर चीन असून, तरुणांच्या बाबतीत भारताची स्थिती चीनपेक्षा चांगली आहे. यावेळी भारताची निम्मी लोकसंख्या 25 पेक्षा कमी वयोगटातील आहे. त्याचवेळी 25.4 कोटी लोकसंख्या ही 15 ते 24 वयोगटातील आहे. भारताची सुमारे 66 टक्के लोकसंख्या 35 पेक्षा कमी वयोगटातील आहे. भारत डिजिटल टेक्नॉलॉजीच्या बळावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन, रोबाटिक्स, ग्रीन एनर्जी, चौथी औद्योगिक क्रांती आणि डिजिटल पेमेंटच्या आघाडीवर वाटचाल करत आहे. अशा वेळी नव्या पिढीला देश आणि जगभरात रोजगाराच्या नवीन संधी दिसत आहेत.
आगामी काळात तरुणांना चांगले इंग्रजी, कॉम्प्युटर, आयटी कौशल्य, कोडिंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, दळणवळण, वेब डिझाईन, कौशल्य विकास, संशोधन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन, क्लाऊड कम्पाऊंडिंग, मशिन लर्निंग, डेटा सायन्ससारख्या प्रगतशील तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जाईल. आता देशात स्किल इंडिया डिजिटल माध्यमातून कौशल्य, शिक्षण आणि उद्योजकता वाढविण्यासाठी डिजिटल सार्वजनिक आरखड्याचा संपूर्णपणे लाभ घेत नव्या पिढीसाठी अधिकाधिक रोजगारनिर्मिती करावी लागणार आहे. त्याचबरोबर देशभरात यावर्षी 2023-24 मध्ये पंतप्रधान कौशल्य विकास योजना 4.0 च्या माध्यमातून तरुणांना निश्चित केलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कौशल्य आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या दिशेने न्यावे लागेल. भारताच्या आर्थिक विकासाचा हाच मोठा आधार आहे. विकसित भारत करण्यासाठी 2047 पर्यंत सलग 7 ते 8 टक्के दराने वाटचाल करावी लागेल.