Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : दिवाळीच्या तयारीत कपडे खरेदीची लगबग

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असून ग्राहकांचा कपडे खरेदीला चांगला उत्साह आहे. कपड्यांमुळे व्यक्तिमत्त्व खुलत असल्याने दिवाळीच्या तयारीत कपडे खरेदीची लगबग वाढली आहे. कपड्यांच्या रेडिमेड दुकानात स्टाईल अन् फॅशनला पसंती दिली जात आहे. कपड्याची गुणवत्ता, सूत पाहून खरेदी केले जात आहे. सहकुटुंब कपडे खरेदीस नागरिक प्राधान्य देत आहेत. मात्र यंदा १० ते १२ टक्के महागाईची झळ सोसावी लागत असून कपड्याच्या व्हरायटीही कमी आहे. ग्राहकांमध्ये रेडिमेड कपडे खरेदी करण्याचा ट्रेंड कायम आहे. टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या विविध फॅशनच्या कपड्यांची ग्राहकांकडून मागणी करण्यात येत आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विविध योजना लागू केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलांसाठी ब्रँडेड कपडे खरेदी करण्यास ग्राहक प्राधान्य देत आहेत. शिवाय, ग्राहक फॅन्सी व आकर्षक कपड्यांची खरेदी करताना दिसत आहेत. महिलांसाठी यंदा बाजारामध्ये सिल्क, साफर व इकर सिल्क, पैठणी, कांजीवरम, चंदेरी, बनारसी शालू, तरुणींसाठी गरारा, प्लाझो साड्यांमध्ये लिनिन, डिझायनर साडी, काठ पदर, प्रिंटेड साड्यांची मागणी होत आहे. खास वर्क असलेल्या साड्यांनाही पसंती मिळत आहे. तरुण फॅन्सी जीन्स, तसेच कुर्ता-पायजमा खरेदीला प्राधान्य देत आहेत. डेक्कन रोड, राजाराम मैदान परिसर, जय हिंद मंडळ, लक्ष्मी मार्केट, शॉपिंग सेंटर आदी भागात कपड्यांच्या सेलमध्येही गर्दी होत आहे. महिन्याच्या सुरुवातीला नोकरदारांचे पगार झाले आहेत. पगार आणि दिवाळीचा बोनस हाती पडल्याने बहुतेक कुटुंब खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र कामगारांचे पगार आणि बोनस अद्याप झाले नाहीत. त्यामुळे आणखी तीन दिवसांनी बाजारात आणखी गर्दी होणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठेत अनेक व्यावसायिकांनी खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट, तसेच बक्षीस ठेवले आहे. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.