उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही आता गारठा वाढू लागला असून अजूनही थंडी सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरणार आहेत. मध्य आणि पूर्व भारतात येत्या 48 तासांत तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. आता वातावरणात पुन्हा बदल झाल्याने हवामान खात्याने राज्यात थंडीच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. शिवाय अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली होती.
राज्यात हुडहुडी, गारठा वाढणार
मकर संक्रांतीनंतर राज्यात हुडहुडी पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस राज्यातील गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही आठवड्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला होता. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात कुठे पाऊस तर कुठे थंडी असं चित्र पाहायला मिळत होतं.येत्या काही दिवसांत राज्यातील थंडीला सुरुवात होणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भात तापमान घसरण्याचा अंदाज, हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढील तीन दिवसात राज्याच्या तापमानात घट
आजही देशासह राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, बुधवारी राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून मैदानी प्रदेशात पोहोचणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम राज्याच्या हवामानावरही होताना दिसत आहे. परिणामी राज्याच्या तापमानात पुढील काही दिवसात घट होणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केली आहे.