Logo
ताज्या बातम्या

नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. यावेळी प्रभावी सिग्नल, पार्किंग झोन, मुख्य मार्गावरील पार्किंगचे पांढरे पट्टे मारणे, रस्त्यावर वारंवार अतिक्रमण करणाऱ्‍यांवर कठोर कारवाई करणे, ट्रान्सपोर्ट पार्किंग हब, गर्दीच्या ठिकाणी स्पीडब्रेकर, दिवाळी बाजार स्थलांतरण, वाहतूक आराखडा अंमलबजावणी असे महत्त्वपूर्ण निर्णय आज वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत घेतले. अध्यक्षस्थानी पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे होते. अवजड वाहनांसाठी तयार केलेल्या शहराबाहेरील रिंग रोडची दुरवस्था झाली आहे. याचा बोजा मुख्य मार्गावर पडत आहे. चौकाचौकात सिग्नल सुरू करूनही प्रभावी नाही. रस्त्यावरच व्यवसायासाठी केलेले अतिक्रमण अशा कारणांमुळे मार्गक्रमण करणाऱ्‍यांना नेहमीच अडचणी निर्माण होत आहेत. कारवाई करताना वाहतूक कर्मचाऱ्‍यांनाही अडचण येत आहे. अशा परिस्थितीत आज तब्बल तीन वर्षांनी वाहतूक सल्लागार समितीची बैठक रोटरी क्लब दाते मळा येथे झाली. विविध सामाजिक संघटना, मालवाहतूक संघटना, फेरीवाला समिती, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, माजी लोकप्रतिनिधी यासह उपस्थितांनी भूमिका मांडत नाराजी स्पष्ट केली. महावितरण, महानगरपालिका, एसटी आगार, बांधकाम आदी विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित वाहतूक उपययोजनांबाबत धारेवर धरले. ओव्हरलोड व अवजड वाहतुकीच्या प्रश्नावर चर्चा निष्फळ ठरली. याप्रश्नासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजीव पाटील यांनी सांगितले. एसटी आगार व्यवस्थापक सागर पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, बांधकाम उपअभियंता एस. एस. पाटील, महापालिकेचे नगर अभियंता एम. डी. क्षीरसागर आदिनी आपापल्या विभागाकडून वाहतूक नियोजनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तीन वर्षानंतर आज बैठक झाली. बैठकीतून योग्य त्या सूचनांचे पालन करून वाहतूक नियोजन व नियमनाबद्दल उपयोजना केल्या जातील. येत्या काही दिवसात वाहतूक शिस्तीच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम दिसेल, असा विश्वास पोलिस उपाधीक्षक श्री. साळवे यांनी व्यक्त केला. पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, प्रवीण खानापुरे उपस्थित होते.