दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांतील महिलांना दरवर्षी एक साडी भेट म्हणून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभरात सुमारे 25 लाख पिवळे रेशन कार्डधारक कुटुंबे आहेत. या सर्व कुटुंबांतील महिलांना रेशन दुकानांतून वर्षातून एकदा ही साडी मोफत वितरित केली जाणार आहे.
राज्यात 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. या धोरणातील तरतुदीनुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी यंत्रमागावरील एक साडी मोफत दिली जाणार आहे. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत. त्यामुळे या सर्व कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढील पाच वर्षे दरवर्षी एक याप्रमाणे या कुटुंबांना साडी वितरित केली जाणार आहे. कोणत्या सणाला साडी वितरित करायची, याबाबतची घोषणा लवकरच राज्य सरकारकडून केली जाणार आहे.