पंतप्रधान मोदींनी मंगळवारपासून केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. यासोबतच तामिळनाडूतील थुथुकुडीमध्ये 17 हजार कोटी ऊपयांहून अधिक किमतीच्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यादरम्यान त्यांनी कुलसेकरपट्टीनम येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणीही केली.
986 कोटी ऊपये खर्च करून कुलसेकरपट्टीनम येथे इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची उभारणी केली जाणार आहे. हा तळ सज्ज झाल्यानंतर, येथून दरवषी 24 प्रक्षेपणे केली जातील. यासोबत, या नवीन इस्रो पॅम्पसमध्ये ‘मोबाईल लॉन्च स्ट्रक्चर’ (एमएलएस) आणि 35 केंद्रांचा समावेश असल्यामुळे अवकाश संशोधन क्षमता वाढण्यास मदत होईल.
तामिळनाडू आता ‘प्रगतीचा नवा अध्याय’ लिहित असून केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे तामिळनाडूमधील आधुनिक कनेक्टिव्हिटी नव्या उच्चांकावर असल्याचे पंतप्रधानांनी प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले. याप्रसंगी द्रमुक लोकसभा खासदार कनिमोझी आणि तामिळनाडूचे पीडब्ल्यूडी मंत्री ई. व्ही. वेलू व्यासपीठावर उपस्थित होते.
दरवषी 20 ते 30 प्रक्षेपणे : इस्रो प्रमुख
दुसऱ्या स्पेसपोर्ट लॉन्च कॉम्प्लेक्सची पंतप्रधान मोदींनी पायाभरणी केल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या नवीन प्रक्षेपण संकुलाची माहिती माध्यमांना दिली. या संकुलाच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तामिळनाडू सरकारने इस्रोकडे जमीन हस्तांतरित केली असून लवकरच बांधकाम सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागतील. दोन वर्षांनी एसएसएलव्ही लाँच करण्याची आमची योजना असून दरवषी 20 ते 30 प्रक्षेपणांचे उद्दिष्ट निर्धारित केल्याचे इस्रो प्रमुखांनी स्पष्ट केले.
तामिळनाडू सरकारकडून जाहिरातीत चिनी रॉकेटचा वापर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तामिळनाडू दौऱ्यादरम्यान इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणी करण्यात आली. यानिमित्ताने द्रमुक सरकारने स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमुळे त्यांना पेच सहन करावा लागत आहे. द्रमुक सरकारने दिलेल्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन आणि पंतप्रधान मोदी यांच्या फोटोंच्या मागे एक रॉकेट दिसत असून त्यावर चीनचा ध्वज दिसत आहे. या जाहिरातीचे चित्र समोर आल्यानंतर सोशल मीडियावर स्टॅलिन सरकारच्या कृतीचा निषेध केला जात आहे.
चिनी ध्वजावरून पंतप्रधानांनी द्रमुकला फटकारले
जाहिरातीतील चिनी ध्वजावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुकवर निशाणा साधला. भारताचे अंतराळ यश तामिळनाडूसमोर ठेवायचे नव्हते. त्यांनी आमच्या शास्त्रज्ञांचा अपमान केला. आमच्या अंतराळ क्षेत्राचा अपमान केला. तुमच्या कराच्या पैशाचा आणि जनतेचा अपमान केला. आता हे करणाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले.