Logo
ताज्या बातम्या

MBBSच्या रिक्त १५० जागांसाठी विशेष फेरी; बीडीएस, नर्सिंगच्या २५८ जागांचाही समावेश

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमातील देशभरात रिक्त राहिलेल्या एमबीबीएसच्या जवळपास दीडशे जागांकरिता विशेष फेरी राबविली जाणार आहे. बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंगच्या २५८ जागांचा समावेश या विशेष फेरीत असेल. वैद्यकीय प्रवेशाच्या जागा रिक्त राहून वाया जाऊ नये म्हणून ही विशेष फेरी राबविण्यात येत आहे. कुठेच प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. मात्र, या फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जागा वाटप होऊनही प्रवेश निश्चित केला नाही तर त्यांना पुढील वर्षी नीटला बसता येणार नाही. तसेच त्यांची अनामत रक्कमही जप्त होईल, अशी अट मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने घातली आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएस्सी नर्सिंगसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. ३१ ऑक्टोबरपासून याकरिता नोंदणी सुरू झाली आहे.  ५ नोव्हेंबरपर्यंत याकरिता विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. एमबीबीएसच्या केंद्रीय (ऑल इंडिया) कोटा, राज्याचा कोटा, अभिमत विद्यापीठे, एम्स, जेआयपीएमईआरतील एकूण १५६ जागांसाठी होणाऱ्या या विशेष फेरीत महाराष्ट्रातील ११ जागांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर या जागा भरल्या जात आहेत. ३१ ऑक्टोबरनंतरचे नर्सिंग प्रवेश अनियमित नर्सिंग प्रवेशासाठी प्रवेश निकष शिथिल केल्यानंतर नव्याने प्रवेश फेरी राबविली जाणार आहे. मात्र, प्रवेशाची मुदत उलटून गेल्यामुळे १ नोव्हेंबरनंतर नर्सिंगकरिता जितके प्रवेश होतील हे अनियमित बॅच म्हणून ओळखले जातील. या मुलांची परीक्षा स्वतंत्रपणे होईल. निकष शिथिल झाल्याने शून्य पर्सेंटाईल असलेल्यांनाही बीएस्सी नर्सिंगला प्रवेश घेता येणार आहे. या मुलांना किमान ८० टक्के उपस्थिती बंधनकारक असेल.