Logo
ताज्या बातम्या

संसदेचे कामकाज सुरू होताच ‘जय श्रीराम’च्या घोषणा; विरोधकांचा गोंधळ, कोणते मुद्दे गाजले?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्याच्या संकल्पासह आमचे सरकार पुढे जात आहे. चार वर्षांमध्ये तेजीने आर्थिक विकास झाला आहे. जुलैमध्ये विकसित भारताचा रोडमॅप सादर करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. मात्र, संसदेच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. संसदेच्या लोकसभा सभागृहात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे विरोधकांकडून गोंधळाला सुरुवात झाली. दुसरीकडे, संसदेच्या राज्यसभा सभागृहात केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यात खडाजंगी झाली. पियुष गोयल यांनी काँग्रेस देश तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. याला मल्लिकार्जुन खरगे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यावरून सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. काँग्रेस कधीही देश तोडण्याचे बोलू शकत नाही. जर कोणी देश तोडण्याचे बोलले तर काँग्रेस त्याला विरोध करेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले. हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवरून काँग्रेस-भाजपा आमनेसामने मल्लिकार्जुन खरगे यांनी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्यावरील ईडी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. बिहारमध्ये नितीश कुमार राजीनामा देतात आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करतात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात. परंतु झारखंडमध्ये अद्याप मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप खरगे यांनी लगावला. यावर, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे समर्थन करणे काँग्रेससाठी लज्जास्पद आहे. भ्रष्टाचार हा काँग्रेसच्याच डीएनएमध्ये आहे, असा पलटवार पियूष गोयल यांनी केला. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने सातत्याने नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर होण्यास नकार देत आहेत. मला अटक करण्यासाठी हे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केजरीवाल यांच्याकडून केला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री अर्जून मेघवाल यांनी प्रतिक्रिया देताना, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. संविधानकर्त्यांनी कायद्याचे काम नेमून दिले आहे, असे म्हटले आहे.