Logo
राजकारण

महायुतीची आज दिल्लीत अमित शाहांसोबत बैठक, जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार?

महायुतीच्या जागावाटपाबाबत महत्वाची माहिती समोर येत असून, आज दिल्लीत महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अमित शाह स्वतः उपस्थित असणार असून, याच बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. बैठकीला राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार असून, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार देखील जाण्याची शक्यता आहे. महायुतीमधील जागावाटपाच्या घडामोडींना आता वेग आला असून, थेट दिल्लीत बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. तर, आज अमित शाह यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक होणार असून, यात जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे घटक पक्षांच्या जागा वाटपाबद्दल आज महायुतीमध्ये अंतिम चर्चा होऊन जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 7 जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या बैठकीत तोडगा निघण्याची दाट शक्यता महायुतीमध्ये मागील अनेक दिवसांपासून जागावाटपावरून बैठका होत आहे. मात्र, काही जागांवरून नाराजीचा सुरु असल्याने यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. परंतु, आता लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला असून, आजची बैठक महत्वाची समजली जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कुणाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. राज ठाकरेंना किती जागा मिळणार? मनसे प्रमुख राज ठाकरे देखील दिल्लीत पोहचले असून, महायुतीत त्यांचा देखील समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे. तर, मनसे नेते बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दक्षिण मुंबई मतदारसंघाकडे पहिले जाते. विशेष म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघातून बाळा नांदगावकर हे सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतून त्यांना लोकसभेत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मनसे विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.