Logo
राजकारण

राज्‍य सरकारकडून आमची फसवणूक : मनोज जरांगे-पाटील

आश्वासन देऊनही मराठ्यांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. सरकारने आमची फसवणूक केली आहे, असा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला. आता पूर्वीचा मराठा राहिला नाही. कोणत्याही पक्षाच्या नेत्याला न जुमानता मराठा आपल्या लेकरांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवेल, असा इशाराही त्‍यांनी दिला. संभाजीनगर येथील गॅलेक्सी रूग्णालयात आज (दि.१४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समाजाला विचारूनच पुढील निर्णय घेणार या वेळी जरांगे-पाटील म्‍हणाले की, समाजापेक्षा मी मोठा नाही, त्यामुळे समाजाला विचारूनच मी पुढील निर्णय घेणार आहे. समाजाच्या विचारल्याशिवाय मी कोणताच निर्णय घेणार नाही. आंदोलनाची दिशा ही समाजाला विचारूनच ठरवली जाणार आहे. १७ डिसेंबर राेजी अंतिम भूमिका ठरवण्यासाठी बैठक रविवार, १७ डिसेंबर राेजी बैठकीनंतरच मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणप्रश्नावर अंतिम भूमिका ठरवण्यासाठी १७ तारखेला सकाळी ९ वाजता बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला समाजातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. मराठा प्रश्नाचे आंदोलनाची व्‍याप्‍ती वाढेल ; पण हे आंदाेलन शांततेच्‍या मार्गाने होणार आहे, असेही जरांगे -पाटील यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.