Logo
ताज्या बातम्या

घराणेशाहीमुळे देशाची अधोगती : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 तासांच्या आत पुन्हा एकदा तेलंगणात पोहोचले. मोदींनी मंगळवारी सर्वप्रथम सिकंदराबाद येथील श्री उज्जयिनी महाकाली मंदिरात पूजा केली. त्यानंतर संगारे•ाrमध्ये 7200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे अनावरण केले आहे. येथे आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाचे नेते मला शिव्या का देत आहेत याचे कारण मला माहिती आहे. हा मोदी त्यांना बोचत आहे, याचे कारण म्हणजे मी त्यांच्या शेकडो हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा भांडाफोड करत आहे असे उद्गार मोदींनी काढले आहेत. विरोधी पक्षांच्या घराणेशाहीच्या विरोधात मी बोलत आहे. कधीच वैयक्तिक स्तरावर मी आरोप केले नाहीत. विरोधी पक्षांना माझ्या भूमिकेला प्रत्युत्तर देता येत नाही. म्हणून मग ते मोदीला परिवारच नसल्याचे म्हणू लागतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे परिवार असेल तर मग त्यांना चोरी करण्याची सूट आहे का, सत्तेवर कब्जा करण्याची सूट आहे का असे प्रश्नार्थक विधान मोदींनी केले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्तेवर असताना भ्रष्टाचार करत जमीन-आकाशच विकून टाकले आणि स्वत:साठी टोलेजंग निवासस्थानं बांधली. परंतु मी आजवर स्वत:साठी घर देखील बांधलेले नाही. गुजरातचा मुख्यमंत्री आणि आता देशाचा पंतप्रधान असताना आतापर्यंत 150 कोटी रुपयांच्या भेटवस्तूंचा लिलाव करत तो पैसा जनतेच्या सेवेकरता खर्च केला असल्याचे मोदींनी म्हटले आहे. जे बोलतो, ते करून दाखवितो तेलंगणात दोन दिवसांमध्ये 63 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीच्या प्रकल्पांच्या शिलान्यास आणि लोकार्पण झाले आहे. मोदी जे बोलतो ते करून दाखवितो हे जनतेला माहित आहे. भारताला पूर्ण जगात एक नवी उंची गाठून देईन असे मी म्हटले होते. आज भारत पूर्ण जगात आशेचा किरण ठरला असल्याचे जनता पाहत आहे. आम्ही जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करणार असल्याचे सांगितले होते. हे आश्वासन भाजपने पूर्ण करून दाखविले. आम्ही सर्व मिळून अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान रामाचे स्वागत करू असे बोलले होतो. हे आश्वासनही पूर्ण केले, मोदीची गॅरंटी पूर्ण झाल्याचे पंतप्रधानांनी सभेत म्हटले आहे. विरोधकांकडून माझ्याकरता शिव्यांची लाखोली मोदी जनतेला दिलेली गॅरंटी पूर्ण करण्यासाठी झटत असताना काँग्रेस आणि त्याचे साथीदार मोदीला आणि मोदीच्या परिवाराला शिव्या देत आहेत. विरोधी पक्षांच्या शेकडो हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करत करत असल्याने हे घडतेय. मी या लोकांच्या घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवत आहे. जम्मू-काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत पाहिल्यास घराणेशाहीयुक्त पक्ष सत्तेवर असल्याचे दिसून येते. अशा राज्यांमध्ये परिवार मजबूत झाले आणि राज्यं उद्ध्वस्त झाल्याचा दावा मोदींनी केला. माझ्यासाठी देशच परिवार एकाच परिवारातील 50-50 लोकांना पदांवर विराजमान होताना पाहिले आहे. विरोधी पक्ष हे फॅमिली फर्स्ट असे म्हणत आहेत, तर मोदीसाठी देश प्रथम आहे. विरोधी पक्षांसाठी परिवारच सर्वस्व आहे. याचमुळे त्यांनी परिवाराकरता देशहिताला तिलांजली दिली. तर मोदीने देशहितासाठी स्वत:ला वाहून दिले आहे. काँग्रेसमध्ये ाता 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्याला पुढे जाऊ दिले जात नाही. कुणाला पद द्यायचे असल्यास 80-85 वर्षे झालेल्या नेत्याची निवड करतील. 50-55 वर्षांचा नेता आला आणि त्याने राहुल गांधींना मागे टाकले तर परिवाराचे काय होणार अशी भीती काँग्रेसला सतावते. तर दुसरीकडे मोदी देशाच्या राजकारणात प्रामाणिक युवांना संधी देत आहे. या घराणेशाहीयुक्त पक्षांनी देशाला लुटून स्वत:ची तिजोरी भरली. तर मोदीने स्वत:ला मिळणारे वेतनही लोकांसाठी खर्च केले असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.