श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण झाले आहे. राज्य शासन एक हजार कोटी देण्यासाठी सकारात्मक आहे. अंबाबाई मंदिरासह श्री जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी दत्त मंदिर व परिसराचाही विकास करण्यात येईल. सध्याच्या दहापट भाविकांची संख्या वाढवून कोल्हापूर जिल्हा देशात तीर्थक्षेत्र म्हणून एक नंबरवर आणू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील रहिवासी व व्यापार्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात 100 कोटींच्या रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याला पुढील आर्थिक वर्षात निधीची तरतूद होईल. जनतेसमोर हा आराखडा सादर केला जाईल. विकासकामांसाठी सर्वांनी सहकार्य करावे. कुणाला प्रश्न किंवा शंका असतील, तर आमच्याशी किंवा अधिकार्यांशी संपर्क साधा. तसेच कोल्हापूर हे आदर्श शहर बनविण्याची ग्वाहीही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.