इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रात पुन्हा जलपर्णीचा विळखा पडला आहे. या जलपर्णीचे प्रमाण वाढत असल्याने या पात्रातील जलचरांनाही त्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील अनेक नागरिक पहाटे नदीमध्ये पोहण्यासाठी येत असतात. त्यांना जलपर्णीचा अडथळा होत असून, त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जलपर्णीमुळे पाणी दूषित होऊन साथीच्या आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. या नदीच्या पाण्यावर अनेक गावांना पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या गावांतील नागरिकांनाही दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.