भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जात आहे. आज (17 फेब्रुवारी) सामन्याचा तिसरा दिवशी लंचनंतर इंग्लंडचा डाव गडगडला. इंग्लडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या हाेत्या. आता १२६ धावांची आघाडी मिळाली आहे.
सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 445 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 2 गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात पाच गडी गमावून 290 धावा केल्या होत्या. अश्विनच्या अनुपस्थितीमध्ये चार गोलंदाजांसह मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला आजच्या पहिल्या सत्रात त्याची अनुपस्थिती जाणवली नाही. या सत्रात इंग्लंडने 26 षटकांत 83 धावा केल्या. बुमराहने रूटला (18) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर कुलदीपने बेअरस्टोला खाते उघडू दिले नाही. इंग्लंडला 260 धावांवर पाचवा धक्का बसला. कुलदीप यादवच्या फिरकीने त्याने बेन डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेटने 151 चेंडूत 153 धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 23 चौकार आणि दोन षटकार मारले.
लंचनंतर इंग्लंडचा डाव गडगडला
लंचनंतर इंग्लडला सलग तीन धक्के बसले. रवींद्र जडेजाला षटकार मारण्याच्या प्रयत्नात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स झेलबाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याचा झेल घेतला.यष्टीरक्षक बेन फॉक्स 13 धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. सिराजने 66व्या षटकातील पहिला चेंडूवर १३ धावांवर फलंदाजी करणार्या यष्टीरक्षक बेन फॉक्सला याला रोहित शर्माकरवी झेल बाद केले. याच षटकात इंग्लंडने 300 धावा पूर्ण केल्या. ७० व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने इंग्लंडला 8वा धक्का दिला. रेहान अहमदला त्याने क्लीन बोल्ड केले. ७१व्या षटकाचा टॉम हार्टलीला तंबूत धाडत रवींद्र जडेजाने इंग्लंडला 9वा धक्का दिला. हार्टले यष्टीचीत झाला. यानंतर ७२ व्या षटकातच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनला बोल्ड करत इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर गुंडाळला. मार्क वुड ४ धावा करून नाबाद राहिला.
भारताला १२६ धावांची आघाडी
सामन्याच्या तिसर्या दिवशी भारताला १२६ धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ४ बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून बेन डकेट याने सर्वाधिक १५३ धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्स याने ४१ तर ऑली पोप याने ३९ धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.