Logo
क्रीडा

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना

एकाच मालिकेत तीन स्वतंत्र कर्णधारांसह मैदानात उतरण्यासाठी सज्ज असणारा भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी रवाना झाला. या दौर्‍यात भारतीय संघ आधी टी-20, एकदिवसीय आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळणार आहे. राहुल द्रविडही टीम इंडियाबरोबर दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. भारतीय क्रिकेट संघ प्रशिक्षकपदी राहुल द्रविडला अलीकडेच मुदतवाढ देण्यात आली आहे. टीम इंडिया बुधवारी सकाळी बंगळूर विमानतळावरून दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाली. या दौर्‍याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होईल, त्यातील पहिला सामना रविवार, 10 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. पहिला सामना 10 डिसेंबरला डरबनमध्ये खेळवला जाईल. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि शेवटी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. कर्णधार रोहित शर्माबरोबर विराट कोहलीही कसोटीत पुनरागमन करेल, त्याने वन-डे आणि टी-20 मालिकेतून ब—ेक घेतला आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल आणि के. एल. राहुल वन-डेमध्ये नेतृत्व करेल. एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर त्यांना मुदतवाढ जाहीर करण्यात आली. प्रशिक्षकपदाचा कालावधी जाहीर करण्यात आला नसला, तरी जूनमध्ये होणार्‍या विश्वचषकापर्यंत राहुल द्रविड प्रशिक्षकपदावर राहणार असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक होते. पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर द्रविडची ही पहिलीच मालिका आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यात मर्यादित षटकांच्या मालिकेत सहभागी असलेला वेगवान गोलंदाज दीपक चहरला टी-20 मालिका खेळणे शक्य होणार नाही, असे संकेत आहेत. वडिलांची तब्येत बिघडल्याने तो टीम इंडियासोबत जाऊ शकला नाही.