भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे आहे. रांचीमधील चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा मानस आहे, तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघानेही मालिका बरोबरीत आणण्यासाठी कंबर कसली आहे.
इंग्लंडने या सामन्यासाठी त्यांच्या प्लेईंग-11 ची गुरुवारी घोषणा केली. इंग्लिश संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. फिरकी गोलंदाज रेहान अहमदच्या जागी मिस्ट्री स्पिनर शोएब बशीरचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे, तर मार्क वुडच्या जागी वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला स्थान मिळाले आहे.
सध्या भारतीय संघाची वरची फळी मजबूत आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वाल दमदार कामगिरी करताना दिसत आहे. या दोघांना वरच्या फळीत शुभमन गिलदेखील चांगली साथसंगत करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत वरच्या फळीतील खेळाडू बदलण्याची फारशी गरज असल्याचे दिसत नाही.
मधल्या फळीचा विचार करायचा झाल्यास, महत्त्वाचा भाग म्हणजे देवदत्त पडिक्कलला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. रजत पाटीदारला दोन कसोटी सामन्यांत संधी मिळूनही तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या जागी पडिक्कलला संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर सध्या चांगल्या फॉर्मात असलेला सर्फराज खान पाचव्या क्रमांकावर जबाबदारी चोख बजावत आहे.