देशात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहेत. याविरोधात मतभेद विसरून एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मांडले. प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात शरद पवारांसह विरोधी बाकांवरील पक्षांच्या नेत्यांनी एकजुटीची हाक दिली.
भारताचे माजी अर्थमंत्री, प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा समारोपाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते जी. जी. पारीख होते. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार कुमार केतकर, कर्नाटकचे मंत्री बी. आर. पाटील, मेधा पाटकर, शेकापचे जयंत पाटील, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो आदी उपस्थित होते.