आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार्या शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर 22 जानेवारीला म्हणजेच श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी सुनावणी होणार आहे. याच प्रकरणात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची अडचण होऊ नये, यासाठी ठाकरे गटाच्या वकिलांनी बुधवारी धावपळ करून सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.
अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, याच निकालाला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. शिंदे गटाच्या याचिकेवर उच्च न्यायालयात 8 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने 22 जानेवारी ही तारीख सुनावणीसाठी दिली आहे. ठाकरे गटाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी विनंती करण्यात आली नव्हती. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाला नोटीस जारी केल्यानंतर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी विनंती केली.