पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘पंतप्रधान जनमन’ योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना मोठी भेट दिली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचविला. मला अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण आले, हे मी माझे भाग्य समजतो, अशी कृतज्ञता पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.
प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरातून आम्हाला दर्शन देऊ लागतील, ती सुवर्णघटिका आता जवळ येते आहे. मी सध्या दररोज सतत नामस्मरण करतो आहे. माता शबरीशिवाय रामाचे स्मरण मात्र माझ्या मते शक्य नाही. माता शबरी, निषाद राज गुह, केवट या समाजाच्या तळागाळातील घटकांनीच दशरथ पुत्र रामाचा दीनबंधू राम केला. देशातील गरिबांचे कल्याण हेच स्वप्न घेऊन आमचीही वाटचाल सुरू आहे. देशातील 4 कोटी गरिबांना आम्ही जात, पंथाचा विचार न करता घरे दिली. या घटकाला आजवर कुणी विचारले नव्हते. मोदीने या घटकाला विचारातही घेतले आणि या घटकाचीच पूजाही बांधली, असे भावोत्कट उद्गारही पंतप्रधानांनी यावेळी काढले.