बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लवकरच अयोध्या नगरीत घर बांधणार आहेत. त्यांनी अयोध्येमधील अभिनंदन लोढा ग्रुपच्या माध्यमातून 10000 स्क्वेअर फूटचा प्लॉट खरेदी केला असल्याचे वृत्त ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिले आहे.
अभिनंदन लोढा ग्रुप अयोध्येत सेव्हन स्टार टाउनशिप विकसित करत आहे. या टाऊनशिपमध्ये अमिताभ बच्चन यांनी 10000 स्क्वेअर फूटचा प्लॉट खरेदी केला आहे. याची किंमत १४.५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी लखनौजवळील काकोरी येथेही जमीन खरेदी केली होती.
अमिताभ यांनी अयोध्येत खरेदी केलेल्या जमिनीपासून राम मंदिर केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तर अयोध्या विमानतळापासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र, यासंदर्भात अभिनंदन लोढा ग्रुपकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. शहराच्या विकासासाठी शासनाने भव्य आणि नवीन अयोध्येचे स्वप्न साकार व्हावे यासाठी हजारो कोटींचे विकास प्रकल्प सुरू झाले आहेत. असे मानले जात आहे की, राम मंदिरामुळे अयोध्या जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल.