भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्रोची (ISRO) सौर मोहीम आदित्य L1 (Aditya-L1) आज अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने सांगितले आहे की, भारताची पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा आदित्य एल1 अंतराळयान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या अंतिम कक्षेत ठेवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
भारत आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज!
आदित्य एल1 ही इस्रोची (ISRO) महत्त्वाकांक्षी सौर मोहिम आहे. या मोहिमेद्वारे सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. आज या मोहिमेत महत्त्वाचा अंतिम टप्पी पार पडणार आहे. आदित्य एल-1 हे अंतराळयान आज एल-1 पॉईंटवर पोहोचणार आहे. आदित्य L-1 आज दुपारी 4 वाजता त्याच्या एल-1 या गंतव्यस्थानावर पोहोचणार आहे. आदित्य L-1 यानाला अवकाशात L-1 पॉईंटवर ठेवण्यात येणार आहे.
ISRO च्या आदित्य L-1 ची आज खरी परीक्षा
L-1 पॉईंटवर आदित्य एल-1 हे अंतराळयान दोन वर्षे सूर्याचा सखोल अभ्यास करेल, ज्यामुळे भविष्यात अनेक रहस्य उलडण्यास मदत होणार आहे. इस्रोने (ISRO) 2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे अंतराळयान लाँच केलं होते. आता सुमारे एक महिन्यानंतर हे यान अपेक्षित स्थळी पोहोचणार आहे. इस्रोच्या या मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. आदित्य एल-1 अंतराळयानाचे सात पेलोड्स सौर घटनेचा अभ्यास करतील.
आदित्य-L1 ला लॅग्रेंज पॉईंटवर पाठवले जाणार
इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लॅग्रेंज यांच्या नावावरून लॅग्रेंज पॉईंट्सची नावे आहेत. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील L1 वर हे यान पाठवण्यात येणार आहे. पृथ्वीपासून L1 चे अंतर सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख किलोमीटर आहे. म्हणजेच आदित्य-एल1 पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटर दूर पाठवलं जाणार आहे.
आदित्य-L1 हा अवकाशात सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताचा पहिला प्रयत्न आहे. मुळात आदित्यला पृथ्वीपासून 800 किमी उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आता, आदित्यला Lagrangian पॉईंट L1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. म्हणूनच, या मिशनला आदित्य-L1 असं म्हटलं जात आहे.
लॅग्रेंज पॉइंट म्हणजे काय?
प्रत्येक ग्रहाजवळ असे काही पाॅईंट असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती, अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून सूर्याच्या तेथून निरीक्षणे नोंदवणे, अभ्यास करणे शक्य असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असे पाच पाॅईंट निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना लॅग्रेंज पॉईंट 1 ते 5 अशी नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी L-1 या पाॅईंटपर्यंत आदित्य यान जाणार आहे. तेथून ते निरीक्षणे नोंदवेल.