Logo
ताज्या बातम्या

'इस्रो'ची ऐतिहासिक 'झेप'; XPoSat चे यशस्वी प्रक्षेपण

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक्सपोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नवीन वर्षात कृष्णविवरांचा अभ्यास (black holes) करण्यासाठी XPoSat हे मिशन लाँच केले. PSLV-C58 रॉकेटच्या माध्यमातून ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह मिशन’चे श्रीहरीकोटा येथून आज (दि.१) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. भारताने आपले पहिले ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह’ हे ध्रुवीय मिशन सुरू केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी ९.१० वाजता PSLV-C58 चे प्रक्षेपण झाले. यामध्ये पीएसएलव्ही सी ५८ सह एक्स-रे पोलरीमेट्री सॅटेलाईट (एक्स्पो सॅट) पाठवण्यात आले आहे. हा उपग्रह कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करेल. जगातील दुसरे ध्रुवीय मिशन एक्स्पो सॅट ही आदित्य एल १ आणि ॲस्ट्रो सेंटनंतर अंतराळात स्थापन होणारी तिसरी वेधशाळा असेल. २०२१ मध्ये लाँच केलेल्या ‘नासा’च्या इमेजिंग एक्स-रे पोलरीमेट्री एक्सप्लोररनंतर हे भारताचे पहिले आणि जगातील दुसरे ध्रुवीय मिशन आहे, असे ‘इस्रो’ने म्हटले आहे. तेजस्वी ताऱ्यांचा अभ्यास करणार या मोहिमेचे उद्दिष्ट विश्वातील ५० तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणे असा आहे. यामध्ये पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, न्यूट्रॉन तारे आणि थर्मल नसलेल्या सुपरनोव्हाचे अवशेष समाविष्ट आहेत. हा उपग्रह ५००-७०० कि.मी.च्या कमी पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल. तो ५ वर्षे विविध स्वरूपाची माहिती गोळा करेल. हा उपग्रह व त्याचा पेलोड यूआर राव उपग्रह आणि रमण संशोधन संस्थेने तयार केला आहे. याव्दारे अंतराळातील दूरच्या स्रोतांची भूमिती आणि यंत्रणा यांची माहिती जमा करणे शक्य होणार आहे.