सध्या घरोघरी लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसून येतो. सध्याच्या काळात ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलांमध्ये मोबाईलमध्ये गेम खेळणं, व्हिडीओ बघणे, मित्र- मैत्रिणींबरोबर चॅटिंग करणे ह्या गोष्टींचे प्रमाण वाढलेले दिसून येते. कामात गुंतलेले असल्यामुळे तसेच वेळेच्या अभावी अनेक पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र मोबाईल लहान मुलांसाठी चष्म्याचे आमंत्रण देत आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मोबाईलच्या अति वापरामुळे त्याचा थेट परिणाम मुलांच्या मेंदूवर, डोळ्यांवर होत असतो. त्यामुळे डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे, अशा समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांना चष्मा देखील लागू शकतो. सध्या लहान मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे मोबाईलचा अतिरेक हा आहे. मुले तासन्तास मोबाईल घेऊन बसत असल्याने चष्म्याचे प्रमाण हे वाढलेले दिसून येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्वच घरी बसून होते. त्यामुळे त्यांच्या करमणुकीचे साधन म्हणजे मोबाईल, टी.व्ही. हेच होते. याचा अती वापर झाल्याने त्याचा परिणाम हा मुलांच्या डोळ्यांवर झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे चष्मा लागण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. जी मुले ऑनलाईन अभ्यास करतात, अशा मुलांना चष्मा असल्यास त्यांनी ब्ल्यूक्ट ह्या चष्म्याच्या ग्लासेस वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच दररोज गार पाण्याने डोळे धुवावेत. त्याच बरोबर काकडी, गाजर, बीट या फळांचे सेवन केल्यास डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.