Logo
ताज्या बातम्या

कोल्हापूर :साईसिमरनला राष्ट्रपती सुवर्णपदक, तर शेतकऱ्याची मुलगी बिल्कीसला कुलपती सुवर्णपदक

दहावीत प्रथम आल्यावरदेखील कुटुंबातील लोकांनी मुलीला कशाला शिकवतेस, असे नातेवाईक व लोकांकडून आईला सांगितले जात होते. मात्र, आई पाठीशी खंबीर राहिल्याने शिवाजी विद्यापीठाचे यावर्षीचे राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळवू शकले. शासकीय जनसंपर्क अधिकारी होऊन आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार साईसिमरन घाशीने केला आहे. साईसिमरन बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील आहे. घरची परिस्थती बेताची. आठवीत असताना वडिलांचे निधन झाले. दोन भाऊ व माझा आईने सांभाळ केला. शालेय शिक्षण गावातच झाले. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पेठ येथे बारावी तर केआरपी कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. कुटुंबीयांचा विरोध झुगारून आईने काबाडकष्ट करून शिकवले. पदवीचे शिक्षण घेताना व्हाईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले. सध्या विद्यापीठात मास कम्युनिकेशन विभागात शिकत आहे. पदक मिळाल्याचा आनंद आहे. शेतकऱ्याची मुलगी कुलपती सुवर्णपदकाची मानकरी कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाचे यावर्षीचे कुलपतींचे सुवर्णपदक आगर, ता. शिरोळ येथील शेतकऱ्याची मुलगी बिल्कीस गवंडीने पटकाविले आहे. प्राध्यापक होऊन विद्यार्थी घडविण्याचे काम करणार असल्याची भावना तिने व्यक्त केली. बिल्कीसचे वडील शिरोळ तालुक्यातील शेतकरी असून आई गृहिणी आहे. शालेय शिक्षण गावात झाल्यावर पदवीपर्यंतचे शिक्षण गंगाबाई घोडावत कन्या महाविद्यालयातून पूर्ण केले. एमएचे शिक्षण जयसिंगपूर कॉलेजमध्ये घेतले. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने इलेक्ट्रॉनिक्सच्या शोरूममध्ये ‘सीएसआर’ म्हणून काम करीत शिक्षण घेतले. कलाशाखेत एमएला प्रथम क्रमांक मिळवला. यावर्षीचे कुलपतींचे सुवर्णपदक मिळाल्याचा आनंद आहे. त्याचबरोबर मारुलकर स्मृती पुरस्कार, डॉ. चंदुलाल दुबे यासह पाच पुरस्कार मिळाले आहेत. नेट-सेट करून प्राध्यापक होणार असल्याचे बिल्कीसने सांगितले.