२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. मात्र, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जाणार असून, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्याधाम रेल्वे स्टेशनचे लोकार्पण करतील, अशी माहिती देण्यात आहे.
अयोध्येचे खासदार वेद प्रकाश गुप्त यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्टेशन यांसह अनेक योजनांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. काही सूत्रांच्या मते, २५ डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हा लोकार्पण सोहळा होऊ शकतो. तर वेद प्रकाश गुप्त यांनी ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी अयोध्येत येणार असल्याची माहिती दिली. लवकरच तारीख निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
अयोध्या जगातील सर्वोत्तम शहर बनत आहे
येथील लोकांचे भाग्य आहे की अयोध्या जगातील सर्वोत्तम शहर बनत आहे, असेही वेद प्रकाश गुप्त यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या एक अद्वितीय धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख असलेले पर्यटन शहर म्हणून विकसित केले जात आहे. विमानतळ आणि अयोध्याधाम रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनानंतर येथील आर्थिक प्रगतीला नवी चालना मिळणार आहे. याचा फायदा अयोध्येतील जनतेला होणार आहे. पंतप्रधान अयोध्येपासून दिल्लीपर्यंत वंदे भारत ट्रेनचे लोकार्पणही करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर २० जानेवारी २०२४ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत लखनौमधील हॉटेल्सचे आगाऊ बुकिंग होणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लखनऊ हॉटेल असोसिएशनसोबत झालेल्या बैठकीत गृह सचिव संजय प्रसाद यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अतिथींकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नका, असेही सांगण्यात आले आहे.