Logo
ताज्या बातम्या

कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण

कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. त्याचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी बुधवारी दिली. यादव यांनी कोल्हापूर स्थानकाची तपासणी केली. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यादव यांनी कोल्हापूर स्थानकाच्या तपासणीनंतर कोल्हापूर-मिरज मार्गाची पाहणी केली. यावेळी बोलताना यादव म्हणाले, मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचेही दुहेरीकरण होणार आहे, त्याचा प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. तो येत्या चार महिन्यांत होईल. त्यानंतर या कामासाठी मंजुरी दिली जाईल. कोल्हापूर-पुणे दुहेरीकरण झाल्यानंतर या मार्गावरील गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल, असे त्यांनी सांगितले. स्थानकातील कॉर्ड लाईनच्या कामाचा सर्व्हे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत, येत्या एप्रिल-मे पासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत सुरू होईल. कोल्हापूर स्थानकातून सुटणार्‍या सर्वच गाड्या टप्प्याटप्प्याने एलएचबी कोचसह धावतील, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर-मुंबई वंदे भारतबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी यादव यांच्या हस्ते कर्मचार्‍यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष सुहास गुरव, अरिहंत फाऊंडेशनचे जयेश ओसवाल, मोहन शेटे, माहेश्वरी प्रगती महिला मंडळाच्या सुजाता गोयल, मधू बियाणी आदी यावेळी उपस्थित होते. खा. महाडिक यांनी केली यादव यांच्याशी चर्चा खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वस्थानकावर यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. अमृत भारत योजनेंतर्गत स्थानक पुनर्विकास कामाचा खा. महाडिक यांनी आढावा घेतला. कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विविध प्रश्नांबाबत त्यांनी निवेदन दिले. यावेळी यादव यांचा सत्कार करण्यात आला.