दूरसंचार मंत्रालयानं 1 जानेवारी 2024 पासून नव्या मोबाईल कनेक्शन खरेदीचे नियम बदलले आहेत. यामुळे आता ग्राहकांना नवं सिमकार्ड घेणं सोपं झालं आहे. देशात डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी, दूरसंचार विभागानं माहिती दिली आहे की, आता नवं सिम कार्ड मिळविण्यासाठी पेपर बेस्ड केवाईसी वर पूर्ण बंदी असेल. त्यामुळे आता नवं सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना फक्त डिजिटल किंवा ई-केवायसी सबमिट करावं लागणार आहे.
दूरसंचार विभागाकडून अधिसूचना जारी
दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागानं मंगळवारी एक अधिसूचना जारी करून नव्या नियमांबाबत माहिती दिली. नवीन वर्षापासून म्हणजेच, 1 जानेवारी 2024 पासून सिम कार्ड खरेदीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. आता कोणत्याही ग्राहकाला सिमकार्ड मिळविण्यासाठी ई-केवायसी करणं आवश्यक असेल आणि आता कागदावर आधारित केवायसी पूर्णपणे बंद होईल, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.
याशिवाय नवीन मोबाईल कनेक्शन घेण्याचे उर्वरित नियम तसेच राहणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही अधिसूचनेतून सांगण्यात आलं आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सिम कार्ड मिळविण्यासाठी, आपण ई-केवायसी सोबत पेपर आधारित केवायसी करू शकता, परंतु आता 1 जानेवारीपासून ते पूर्णपणे बंद केलं जाईल.
1 डिसेंबर 2023 पासून सिम कार्डच्या नियमांमध्ये बदल
याआधी दूरसंचार मंत्रालयानं सिमकार्डशी संबंधित आणखी एक नियम बदलला आहे. नियमांमध्ये बदल करून केंद्र सरकारनं 1 डिसेंबरपासून एका आयडीवर मर्यादित सिम जारी करण्याचा नियम लागू केला आहे. सिमकार्ड मिळवण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असून आता सिम खरेदी करणाऱ्यांसोबतच सिम विक्रेत्याचीही नोंदणी केली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीनं एकाच वेळी अनेक सिमकार्ड खरेदी केली, तर तो केवळ व्यावसायिक कनेक्शनद्वारेच सिम कार्ड खरेदी करू शकणार आहे.