Logo
ताज्या बातम्या

बीएसएनएल फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू करणार 5G नेटवर्कचं टेस्टिंग - रिपोर्ट

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL पुढील महिन्यात 4G लाँच करण्यासाठी सज्ज झालं आहे. मात्र यासोबतच कंपनीच्या यूजर्सना आणखी एक खुशखबर मिळाली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपासून बीएसएनएल 5G नेटवर्कचं अ‍ॅडव्हान्स टेस्टिंग सुरू करणार आहे. बिझनेस-स्टँडर्डने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 4G आणि 5G सेवेमध्ये आल्यामुळे बीएसएनएलला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंत BSNL 5G सेवा सुरू करण्याचा सीडॉट कंपनीचा मानस आहे. यासाठीच सध्या जोमाने चाचणी सुरू आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (CDOT) या संस्थेमध्ये सुमारे 200 जणांची टीम BSNL 5G वर काम करत आहे. त्यांनी यापूर्वीच बीएसएनएलला नॉन-स्टँडअलोन (NSA) 5G कोअर आणि रेडिओ अ‍ॅक्सेस नेटवर्क (RAN) टेक्नॉलॉजी दिली आहे. आता ते कंपनीला स्टँडअलोन (SA) स्टॅक देण्याबाबत काम करत आहेत. यासाठी 400 कोटींचं बजेट निश्चित करण्यात आलं आहे. 4G नेटवर्कच्या बाबतीत जगाच्या मागे राहिलेल्या बीएसएनएलने 5G टेस्टिंगबाबत मोठा निर्णय घेऊन अखेर आपणही शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे. यामुळे आता बीएसएनएलला आधीप्रमाणेच लोकप्रियता मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.