Logo
ताज्या बातम्या

रामलल्लासाठी ११ किलो सोने, १०१ हिऱ्यांचे मुकुट दान करायचेय, सुकेश चंद्रशेखरचे ट्रस्टला पत्र

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा पत्रामुळे चर्चेत आला आहे. सुकेश चंद्रशेखरने दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून आता एक नवीन इच्छा व्यक्त केली आहे. अयोद्धा राम मंदिरातील प्रभू श्रीरामलल्लाच्या मूर्तीसाठी सोने आणि हिऱ्याचे मुकुट दान करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. यासाठी सुकेशने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या प्रमुखांना दोन पानी पत्र लिहिले आहे. तसेच याबाबत परवानगी देण्याची विनंती केली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक संत-महंत मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला लिहिलेल्या पत्रात सुकेशने मुकुटाबाबत सविस्तर माहिती लिहिली आहे. जे मुकुट दान करायचे आहे, ते ११ किलो वजनाचे असून २२ कॅरेट सोन्याचे आहे. हे मुकूट १०१ हिऱ्यांनी जडलेले आहे. प्रत्येक हिऱ्याचे वजन ५ कॅरेट आहे, असे सुकेशने म्हटले आहे. तसेच आपल्या सामर्थ्यानुसार दान करत आहे, असेही सुकेशने नमूद केले आहे. आमच्यासाठी तो मोठा आशिर्वाद असेल सुकेश चंद्रशेखरने पत्रात म्हटले आहे की, तो आणि त्याचे कुटुंब श्रीराम भक्त आहे. कुटुंबासाठी सदर मुकूट दान करणे हे एक मनोकामना पूर्ण होण्यासारखे आहे. आज जे काही आमच्याजवळ आहे, ते श्रीरामाच्या आशिर्वादामुळेच आहे. त्यासाठी आमचे हे छोटेसे योगदान मंदिराला मिळाले तर, तो आमच्यासाठी मोठा आशिर्वाद असेल, असे सुकेशने सांगितले. दरम्यान, सुकेशने या पत्रात मुकूट बनवणाऱ्या ज्वेलरबाबतही माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या निर्देशानुसार हा मुकुट तयार करण्यात आला आहे. सुकेशचे वकिल ट्रस्टला हा मुकूट त्यांच्यावतीने दान करतील. सुकेशने कायदासल्लागार अनंत मलिक आणि स्टाफ सदस्याला याची जबाबदारी दिली आहे. याबाबतील प्रत्येक गोष्ट बिल, प्रमाणपत्रे आणि कायदेशीर औपचारिकता यांसारख्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतील, असे सांगितले जात आहे.