येत्या काही दिवसांमध्ये विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. देशातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने हवाई इंधनाच्या किंमती कमी केल्यानंतर इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेण्याचा निर्णंय घेतला आहे. एटीएफच्या किंमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर, इंडिगोने ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी हवाई इंधनाच्या किमती कमी केल्या आहेत. त्याचा फायदा इंडिगोने हवाई प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वस्त विमान प्रवासाचे आश्वासन
इंधन शुल्क कमी करण्याच्या निर्णयावर इंडिगोने सांगितले की, एटीएफच्या किमती डायनॅमिक आहेत. आम्ही आमचे भाडे आणि घटक बदलत राहू. इंडिगोने म्हटले आहे की, एअरलाइन आपल्या ग्राहकांना परवडणारी, वेळेवर, विनम्र आणि त्रासमुक्त प्रवास देण्याच्या आपल्या वचनाशी वचनबद्ध आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घसरली आहे. प्रति बॅरल 75 डॉलरच्या आसपास व्यापार करत आहे. त्यामुळे विमान इंधनाचे दर कमी झाले आहेत.
ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन शुल्क लागू करण्यात आले होते
हवाई इंधनाच्या किमती वाढल्यानंतर, इंडिगोने ऑक्टोबर 2023 मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर 300 ते 1,000 रुपयांपर्यंत इंधन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी 1 जानेवारी 2024 पासून हवाई इंधनाच्या किमती 4 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर इंडिगोने इंधन शुल्क लागू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
एअरलाइन्स त्यांच्या खर्चापैकी 40 टक्के हवाई इंधनावर
एअरलाइन्सच्या ऑपरेटिंग खर्चात हवाई इंधनाचा वाटा 40 टक्के आहे. हवाई इंधनाच्या किमती वाढल्यानंतर विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. त्यानंतर त्याचा बोजा ग्राहकांवर टाकावा लागतो. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या सलग तीन महिन्यांच्या हवाई इंधनाच्या किमतींचा आढावा घेताना तेल कंपन्यांनी किमती कमी केल्या. त्यामुळं इंडिगोने इंधन शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे.