पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे सातव्या इंडियन मोबाईल काँग्रेस-2023 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांना 100 ‘5-जी यूज केस लॅब’ प्रदान करतानाच देश आता ‘6-जी’च्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत असल्याचे सुतोवाच केले. इंटरनेट स्पीड वाढल्याने आयुष्य सोपे झाले आहे. तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी काम केले जात आहे. प्रत्येक क्षेत्रात लोकशाहीच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. येणारा भविष्यकाळ पूर्णपणे वेगळा असेल, असेही पंतप्रधान नवी दिल्लीत आयोजित ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’मध्ये म्हणाले.
दिल्लीतील प्रगती मैदानावर पंतप्रधानांनी इंडिया मोबाईल काँग्रेस-2023 चे उद्घाटन केले. जिओचे चेअरमन आकाश अंबानी, एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. ‘आयएमसी’ची यंदाची ही सातवी आवृत्ती आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत आता मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये 118 व्या स्थानावरून 43 व्या स्थानावर पोहोचल्याचे प्रामुख्याने नमूद केले. आमच्या काळात 4-जी चा अभेद्य विस्तार होता. भांडवल, संसाधने आणि तंत्रज्ञानात प्रवेश हे सरकारचे प्राधान्य आहे, असे स्पष्ट केले. देशात 5-जी मोबाईल सेवा सर्वात वेगाने सुरू करण्यात आली, एका वर्षात चार लाख 5-जी बेस स्टेशन स्थापित केले गेले. देशात 5-जी झपाट्याने विस्तारत आहे, असे ते म्हणाले. आम्ही भारतात केवळ 5-जी चा झपाट्याने विस्तार करत नाही, तर 6-जी क्षेत्रात आघाडीवर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आता भारत 6-जी चा नेता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे ते पुढे म्हणाले.
इंडियन मोबाईल काँग्रेस हे 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणारे आशियातील सर्वात मोठे दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच आहे. दूरसंचार आणि तंत्रज्ञानातील भारताच्या अतुलनीय प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी, महत्त्वाच्या घोषणा करण्यासाठी आणि स्टार्ट-अप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपाय दाखविण्याची संधी देण्यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे. या कार्यक्रमात सुमारे 22 देशांतील एक लाखांहून अधिक सदस्य सहभागी होणार असून त्यात सुमारे 5000 आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी, 230 सादरकर्ते, 400 स्टार्टअप्स आणि इतर भागधारकांचा समावेश आहे.
‘आत्मनिर्भर’साठी प्रोत्साहन
उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी आत्मनिर्भर पॅव्हेलियनला भेट देत विविध नव्याने पुढे आलेल्या देशी कंपन्यांची माहिती जाणून घेतली. विशेषत: 5जी सुविधा देण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यानंतर पीएम मोदींनी सी-डॉटच्या पॅव्हेलियनमध्ये क्वांटम संगणक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. पंतप्रधानांनी सेल ब्रॉडकास्टचीही माहिती घेतली. नोकियाच्या स्टॉलवर पंतप्रधानांनी 6जी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. ग्रामीण भारतात तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी यावेळी नवोदित कंपन्यांच्या पुढाकाराला बळ देण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुमार मंगलम बिर्ला हेदेखील त्यांच्यासोबत होते.
स्टार्टअपचे कौतुक
तंत्रज्ञानाच्या वापरानेच देशाचा विकास होईल, असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञानाच्या वापरात भारत कोणाच्याही मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही त्याला तंत्रज्ञानाशी जोडत आहोत. प्रत्येक क्षेत्रानुसार वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत. 2014 पूर्वी भारतात 100 स्टार्टअप होते आणि आता ते 1 लाखाच्या जवळपास पोहोचले आहे. 2014 पासून देशात प्रचंड बदल होत गेला आहे. आम्ही आता मोबाईल आयातदारांपासून निर्यातदार झालो आहोत. जग ‘मेड इन इंडिया’ फोन वापरत आहे. गेल्या नऊ वर्षांत देशाला आयातदाराकडून निर्यातदार बनवणाऱ्या बदलांवर त्यांनी प्रकर्षाने भाष्य केले.
काँग्रेसला उपरोधिकपणे फटकारले
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेसला उपरोधित भाषेत फटकारले. 2014 पूर्वीच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी मोबाईल आणि दूरसंचार क्षेत्राचा दाखला दिला. तुम्ही स्क्रीन कितीही स्वाईप केली, कितीही बटणे दाबली तरी औषधाचा काहीही परिणाम झाला नाही. त्यावेळी सरकारची स्थितीही अशीच होती. त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था किंवा त्यावेळचे सरकार स्वत: लटकण्याच्या अवस्थेत होते. परिस्थिती इतकी बिघडली होती की, पुन्हा सुरू करून उपयोग नव्हता. बॅटरी चार्ज करूनही फायदा झाला नाही, बॅटरी बदलूनही फायदा झाला नाही. 2014 मध्ये लोकांनी अशा कालबाह्य फोनचा त्याग केला आणि आता आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. या बदलामुळे काय झाले तेही स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावेळी आपण मोबाईलचे आयातदार होतो, आज मोबाईलचे निर्यातदार आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.