महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बैठक 25 जानेवारीला मुंबईत होत आहे. या बैठकीत काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम वाटप होईल.
दिल्लीत 9 जानेवारीला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. त्यात जागांचे वाटप प्राथमिक स्तरावर झाले होते. यात उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला, तर राजू शेट्टी यांना हातकणंगले लोकसभेची जागा शरद पवार गटाच्या कोट्यातून देण्याचे ठरले होते. काँग्रेस 20, शिवसेना उद्धव ठाकरे गट 20 आणि शरद पवार गट 8 असे प्राथमिक जागावाटप झाल्याचे आघाडीच्या गोटातून सांगण्यात आले होते; पण आघाडीच्या राज्यातील नेत्यांच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. आघाडीच्या जागावाटपाचे अधिकार काँग्रेसने राज्यातल्या नेत्यांना दिले असून, मुंबईत 25 जानेवारीला जागावाटपाची ही बैठक होईल.