Logo
ताज्या बातम्या

आता महिला सैनिकांनाही अधिकाऱ्यांप्रमाणे मातृत्त्व रजा :संरक्षण मंत्रालयाकडून प्रस्ताव मंजूर

आता सुरक्षा दलातील महिला अधिकाऱ्यांप्रमाणेच महिला सैनिकांनाही प्रसुती, बाल संगोपन आणि दत्तक घेण्यासाठी रजा आणि इतर सुविधांसारखे समान लाभ मिळणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महिला सैनिक, महिला नौसैनिक आणि महिला एअरमेन यांना मातृत्व, बाल संगोपन आणि मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांप्रमाणे रजा आणि इतर सुविधा मिळतील. अग्निवीर महिलांनाही हीच सुविधा मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी महिला सैनिकांना मोठी भेट दिली आहे. आता महिला सैनिकांना त्यांच्या पदाचा विचार न करता समान प्रसुती रजा मिळणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सर्व महिला लष्करी कर्मचाऱ्यांना समान मातृत्व, बाल संगोपन आणि दत्तक रजा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सशस्त्र दलांमध्ये सर्व श्रेणीतील महिलांचा ‘सर्वसमावेशक सहभाग’ सुनिश्चित होईल, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मंत्रालयाने काय घोषणा केली? सशस्त्र दलातील महिला सैनिक, नौसैनिक आणि हवाई दलातील महिला सैनिकांना मातृत्व, बाल संगोपन आणि दत्तक रजा देण्याचे नियम त्यांच्या अधिकारी समकक्षांच्या बरोबरीने लागू होणार असल्यामुळे सैन्यातील सर्व महिलांना समान सुट्ट्या मिळतील. सदर महिला अधिकारी असोत किंवा इतर कोणत्याही पदावर कार्यरत असल्या तरी सुट्ट्यांच्या बाबतीत दुजाभाव केला जाणार नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. तसेच या निर्णयानुसार लष्करातील महिलांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होईल आणि त्यांना सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधण्यास मदत होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. आता किती रजा मिळणार? सध्या महिला अधिकाऱ्यांना प्रत्येक मुलामागे 180 दिवसांची प्रसुती रजा मिळते. हा नियम जास्तीत जास्त दोन मुलांना लागू होतो. संपूर्ण सेवा कालावधीत महिला अधिकाऱ्यांना 360 दिवसांची बाल संगोपन रजा मिळते. तसेच एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाला दत्तक घेण्याच्या वैध तारखेनंतर 180 दिवसांची दत्तक रजा दिली जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मोठ्या बदलांची सुरूवात रजेच्या नियमांचा विस्तार सशस्त्र दलातील महिला-विशिष्ट कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यात खूप मदत करेल, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ‘नारी शक्ती’चा वापर करण्याच्या वचनबद्धतेनुसार तीन सेवांनी महिलांना सैनिक, नौसैनिक आणि हवाई दलाचे कर्मचारी म्हणून समाविष्ट करून एक मोठे परिवर्तन सुरू केले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने पुढे सांगितले.