Logo
राजकारण

पात्र मराठ्यांनाच मिळणार कुणबी प्रमाणपत्र; सरकारचा नवा जीआर जरांगे-पाटील यांनी स्वीकारला

शिंदे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज (दि.४) मनोज जरांगे-पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारचा नवा जीआर जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. दरम्यान, सरकारचा हा नवा जीआर मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील हा जीआर आहे, असे मंत्री भुमरे यांनी स्पष्ट केले. मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली. दरम्यान त्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. प्रथम मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील हा जीआर आहे. तसेच कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती काम करत असून, तारखेअधीच काम पूर्ण होऊ शकते. अल्टिमेटबाबत कोणताही संभ्रम नाही. त्यामुळे पुन्हा राज्यात मोर्चे काढण्याची सरकार वेळ आणून देणार नाही, असे संदीपान भुमरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे साखळी उपोषण सुरूच आहे. दरम्यान, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. तसेच २४ डिसेंबरपर्यंतच सरकारला वेळ दिली आहे, त्याच्यापुढे एक दिवसही थांबणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन जीआरची कॉपी पुढारी न्यूजच्या हाती लागली आहे. यामध्ये कुणबी नोदींचे दाखले असणाऱ्या पात्र मराठ्यांनाच आरक्षण मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.