Logo
राजकारण

मराठा आरक्षणावर विधानसभेत आज चर्चा होणार, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यात मागील तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी बॅनर पहायला मिळाले होते. दरम्यान, राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा होणार आहे. 293 अनवये मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. अंदाजे दुपारनंतर ही चर्चा होणार आहे. मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यत सरकारला मुदत दिल्यानंतर आज सत्ताधारी पक्षाचे नेते मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे अधिवेशनात आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी होत होती. तसेच, अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यामुळे सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज कोणती भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा एकीकडे आज विधानसभेत आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार आहे, तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आता थेट राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी देखील आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला देखील आहे. तर यापूर्वी देखील चार सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनाम दिला आहे. आज मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेत चर्चा होणार आहे, अशात मराठा आरक्षणाला सहाय्यभूत ठरेल अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिळवण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. सरकारच्या भूमिकेकडे लक्ष... मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशात मनोज जरांगे यांच्याकडून सतत काही सत्ताधारी नेत्यांवर थेट आरोप केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत अशी भूमिका या नेत्यांची असून, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहे. तर, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार असल्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. मात्र, आम्हाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण हवे असल्याचं जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामळे आज होणाऱ्या विधानसभेतील चर्चेत सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.