कोपरगाव प्रतिनिधी - नागरिकांच्या अपेक्षांना मोठा हातभार लावत, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत महत्त्वाच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे कोपरगाव शहर आणि परिसरातील वाहतूक, संपर्क सुविधा आणि विकासाची गती आणखी वाढणार आहे.
केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ता समस्येचे गांभीर्य विचारात घेऊन श्री साई बाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन रस्ता (रामा-65) या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या विकासासाठी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे शहरातील प्रवासी, व्यापारी तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रस्त्याची रुंदी, मजबुती आणि गुणवत्ता वाढून सुरक्षित व जलद वाहतुकीला चालना मिळेल. यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक होत आहे तर कोल्हे यांनी नितीन गडकरी आणि शासनाचे आभार मानले आहेत.
याचबरोबर, भोजड–धोत्रे रस्ता (MDR-5) येथील कोळ नदीवरील पुलाच्या कामासाठी शासनाने 7 कोटींची तरतूद केली आहे. या पुलामुळे परिसरातील अनेक गावांना कोपरगाव शहराशी अधिक सुकर, सुरक्षित प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत पावसाळ्यात होत असलेली गैरसोय, वाहतुकीतील अडथळे आणि नागरिकांच्या हालअपेष्टा यावर या पुलामुळे कायमचा उपाय होणार आहे.
या दोन्ही महत्त्वपूर्ण मंजुरीबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. कोपरगाव तालुक्यातील सर्वांगीण विकासाला चालना देणारे हे निर्णय भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.