राज्य कामगार विमा सोसायटी सेवा दवाखाना, इचलकरंजी व यड्राव येथील वैद्यकीय सेवा सुरळीत करावी. विमा सोसायटी यांनी नेमलेल्या खासगी रुग्णालयांनी सेवा बंद केल्या आहेत, त्या सुरू कराव्यात व जी रुग्णालये सेवा देणे नाकारत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघातर्फे वैद्यकीय प्रशासन अधिकारी राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये दिले.
इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ तालुका येथे औद्योगिक वसाहती असल्याने कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामधील बहुतांश कामगार हे राज्य कामगार विमा सोसायटी योजनेला जोडले आहेत. कामगारांच्या पगारामधून ईएसआय योजनेतील कपात दर महिन्याला केली जाते. कपात केलेली रक्कम विमा सोसायटीकडे जमा केली जाते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ईएसआय वर्गणी करोडो रुपयांची आहे. असे असतानाही कामगारांना वैद्यकीय सेवा मिळताना दिसत नाही. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्थानिक विमा दवाखान्यांमधून औषधेही वेळेत मिळत नाहीत. औषधे बाहेरुन घ्यावी लागतात. कामगारांनी सादर केलेली बिलेही वेळेत मिळत नाहीत. अशातच विमा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या खासगी रुग्णालयांनी कामगारांना सेवा देणे बंद केले आहे. तसे फलकही काहींनी लावले आहेत. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तत्काळ मार्ग काढावा, असे निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात प्रकाश कामरे, सुरेश पाटील, सुनील बारवाडे, अतुल दिघे, रवींद्र लाटकर, वसंत आपटे सहभागी होते.