Logo
राजकारण

दोन पक्ष फोडून अडीच वर्षांनी पुन्हा सत्तेत आलो : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री असताना ‘मी पुन्हा येईन’ असे जरूर बोललो होतो. पण ते केवळ एक वाक्य नव्हते तर पुन्हा सत्तेत आल्यावर काय करणार, अशा बर्‍याच गोष्टी त्यात होत्या. त्यासाठी जरासा वेळ लागला. पण अडीच वर्षांनंतर दोन पक्ष फोडूनच सत्तेत आलो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केले. लेखिका प्रियम गांधी यांच्या ‘काँग्रेस ना होती तो क्या होता?’ पुस्तकाचे प्रकाशन वरळीतील एका हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुस्तक प्रकाशनानंतर प्रियम गांधी यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत राहिली. या पक्षाची त्याकाळी एकाधिकारशाही होती. आज देशात अनेक पक्ष निर्माण झाले. पण या पक्षांनी काँग्रेसच्या पठडीतील राजकारण केले. घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारणाचा पायंडा काँग्रेसने पाडला. पण भाजप हा एकमेव पक्ष होता, ज्याने काँग्रेसची विचारधारा व त्यांच्या राजकारणाला नाकारत स्वतंत्र शैली विकसित केली. भाजपने नेहमीच घराणेशाहीला विरोध केला. पण कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखले नाही. नेत्यांच्या पुढच्या पिढीने राजकारण करावे, पण आपल्या हिमतीवर करावे. केवळ आपला राजकीय हक्क समजून ते करू नये. क्षमता असलेल्या इतर लोकांना डावलून काही राजकीय कुटुंबांतील व्यक्तींना राजकारणात आणले जाते, त्याला घराणेशाही म्हणतो. नेहरू- गांधी घराण्याची काँग्रेसमध्ये आजही घराणेशाही आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे असतील. पण सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी हेच निर्णय घेताना दिसतात, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. काँग्रेस नसती तर 370 सारखी चूक झाली नसती. भारत आज एक सशक्त भारत झाला असता. भारताचे विभाजन झाले नसते आणि भ्रष्टाचाराची मालिकाही झाली नसती, असे फडणवीस म्हणाले. सत्तेतून पैसा आणि पैशातून राजकारण सुरू होते. त्यातून अनेकांनी आपली साम्राज्ये उभारली. पहिल्या 50 वर्षांतील हे राजकारण 50 कुटुंबांत फिरले. सामान्य माणूस कुठेच नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे राजकारण बदलले. मुलगा-मुलगी राजकारणात यावा ही घराणेशाही नाही. मात्र चांगल्या लोकांना बाजूला सारून ते स्वत:कडे ठेवणे हा परिवारवाद आहे. शिवसेना आदित्य ठाकरेंमुळे, राष्ट्रवादी सुप्रिया सुळेंमुळे फुटली फडणवीस म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली तर शरद पवारांनी अजित पवारांना डावलून सुप्रिया सुळेंना पुढे आणले. उद्धव ठाकरे यांनीही आदित्य ठाकरे यांना पुढे आणले. ही घराणेशाहीच आहे. केवळ सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप फडणवीस यांनी केला.