Logo
राजकारण

महायुतीत जागावाटपाचा पेच वाढला; शिवसेना 13, राष्ट्रवादी 9 जागांवर ठाम

अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्‍यानंतर महायुतीत निर्माण झालेला जागावाटपाचा पेच जास्तच वाढला आहे. शहा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एक अंकी जागांवर समाधान मानण्यास सांगितले असले, तरी भाजपच्या या भूमिकेने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शिवसेना किमान 13 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागांसाठी आग्रही आहे. त्यावर आता दिल्लीत तोडगा काढला जाणार आहे. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपावर निर्माण झालेल्या वादाचे पडसाद गुरुवारी उमटले आणि नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. त्यामुळे जागावाटपावरून निर्माण झालेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अमित शहा यांनी दोन दिवसांच्या चर्चेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 8 ते 10 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा सोडण्याची तयारी दाखविली. जिंकण्याच्या निकषावर यापेक्षा जास्त जागा देण्यास शहा यांनी नकार दिल्याने जागावाटपावर अंतिम तोडगा निघालेला नाही. काही नेत्यांना कमळ चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, त्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची तयारी नसल्याचे समजते. पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठी आटापिटा केला असताना आता जर कमळ चिन्हावर निवडणूक लढविली, तर विरोधकांकडून टीका होऊ शकते. त्यामुळे हा पर्याय स्वीकारण्यात येणार नसल्याचे समजते. शिवसेनेएवढ्या जागा हव्यात : भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेइतक्याच जागा आम्हालाही मिळायला पाहिजेत, अशी मागणी केली. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भुजबळांचे वैयक्तिक मत आहे, असे सांगत राष्ट्रवादीला जादा जागा मिळणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यावर पलटवार करताना भुजबळांनी सुधीर मुनगंटीवार त्यांना सुनावले. ते म्हणाले, राज्यभरात आमचीही ताकद आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत माझे जे मत आहे तेच आमच्या पक्षाचेही आहे. मी केलेली मागणी वैयक्तिक नसून, पक्षाच्या वतीने केलेली आहे. भुजबळ बोलतो तेव्हा पक्षही बोलतो, हे लक्षात ठेवून मुनगंटीवारांनी यावर बोलण्याचे काही कारणच नाही. महायुतीतील जागांचे योग्य वाटप होईल, असेही भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. केसाने गळा कापू नका : रामदास कदम तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून जे चालले आहे ते अतिशय घृणास्पद चालले आहे, असे सांगून कदम म्हणाले की, आमच्या जागा आहेत तिथे काही भाजपची मंडळी आम्ही उमेदवार आहोत, असे सांगत आहेत. रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर या ठिकाणी हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे मोदी-शहा यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. रामदास कदम यांना गांभीर्याने घेत नाही : फडणवीस रामदास कदम यांच्या वक्तव्यावर देवेेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, कदम यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचा टोला लगावला. रामदासभाईंना मी अनेक वर्षे ओळखतो. अशाप्रकारचे विधान करण्याची आणि टोकाचे बोलण्याची त्यांची सवय आहे. भाजपने शिवसेनेचा सन्मानच केला आहे. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, आम्ही 115 आहोत, तरीदेखील आमच्या सोबत आलेल्या शिंदे यांना आम्ही मुख्यमंत्री केले. कारण, खरी शिवसेना आमच्या सोबत आली याचे आम्हाला समाधान आहे. आमच्या सोबतची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर मित्रपक्षांनाही सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीत पुढे चाललो आहोत. त्यांचा पूर्ण सन्मान ठेवणार आहोत. त्यामुळे अनेकवेळा, अनेक लोक आमचे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आपले महत्त्व पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका घेतात. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी ते गंभीरतेने घेऊ नये, असा पलटवार फडणवीस यांनी केला.